पश्चिम महाराष्ट्र

संघर्षाची भूमिका हे ‘एन.डीं’चे सूत्र - शरद पवार

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - सामान्यांच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी संघर्षाची भूमिका घेणे हेच ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या जीवनाचे सूत्र आहे. प्रकृती ठीक नसली तरी शेतकऱ्यांची प्रकृती ठणठणीत राहावी, यासाठी ते झटत असून, त्यांचे विचार भावी पिढ्यांचे समाजमन घडविण्यासाठी प्रेरक ठरतील, असे गौरवाद्‌गार राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी  येथे काढले. 

शिवाजी विद्यापीठातर्फे डॉ. एन. डी. पाटील यांना श्री. पवार यांच्या हस्ते प्राचार्य रा. कृ. कणबरकर पुरस्काराने गौरविण्यात आले. एक लाख ५१ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. 

या वेळी प्रा. डॉ. भारती पाटील यांच्या हस्ते सरोज पाटील यांचा साडी-चोळी देऊन सत्कार झाला. तसेच, डॉ. भारती पाटील संपादित ‘कोल्हापुरातील कर्तुत्ववान स्त्रिया’ या पुस्तकासह विद्यापीठाच्या दैनंदिनीचे प्रकाशन झाले. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे अध्यक्षस्थानी होते. लोककला केंद्रात कार्यक्रम झाला. 
श्री. पवार यांनी डॉ. पाटील यांच्या संघर्षमय जीवनाचे पदर उलगडत उपस्थितांशी संवाद साधला. शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांविषयी असणारी त्यांची तळमळ मांडली.

ते म्हणाले, ‘‘ज्या काळात जुन्या पिढीला शैक्षणिक सुविधा नव्हत्या, शिक्षणाचा विचार नव्हता, ऐपत नसल्याने चौथी-पाचवीपर्यंत शिक्षण घेतले जात होते, शिक्षणाची संधी ही केवळ मर्यादित घटकांना होती, त्या काळात जिद्द, शिक्षकांची प्रेरणा, कुटुंबीयांची साथ व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर एन.डी. उच्चविद्याविभूषित झाले. ते कर्मवीरांचे आवडते विद्यार्थी. त्यांचा स्वभाव व पार्श्‍वभूमी ही संघर्षाची असल्याने हेच पुढे त्यांच्या जीवनाचे सूत्र बनले. सार्वजनिक जीवनात त्याचे प्रतिबिंब पडले. कोल्हापूरकरांच्या बळावर विधानसभेचे सदस्यत्व मिळाल्यानंतर सातत्याने त्या पदाचा वापर त्यांनी सर्वसामान्यांच्या व्यथा मांडण्यासाठी केला. त्यांची राजकीय विचारधारा ही डावी. शेतकरी कामगार पक्षासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले. ’’

ते म्हणाले, ‘‘एकाधिकार कापूस योजना देशात कुठेच नव्हती. कापूस पिकाला किंमत मिळत नव्हती. सहकार खात्याचे मंत्री असताना एन. डी. यांनी ही योजना मंजूर केली. कापूस पिकविणाऱ्या शेतकऱ्याला किंमत मिळते का? हे कृषी उत्पन्न बाजार समितीत जाऊन पाहण्याची जबाबदारी घेतली. शिक्षण हाही त्यांचा आवडता विषय. त्या काळात त्यांनी शिक्षणाच्या आकृतिबंधाच्या विरोधात महाराष्ट्रात जनजागृती करीत सरकारला अक्षरशः फोडून काढले. ज्याच्यात कुवत त्यानेच शिकायचे, असे त्याचे स्वरूप होते. एन. डीं.च्या घणाघाताने सरकारला आकृतिबंधाचे धोरण बदलावे लागले. शिक्षणाचा अधिकार सर्वांना देण्यामागचे योगदान त्यांचे आहे.’’

सामान्यांच्या पदरात न्यायाचे माप पाडण्यासाठी एन. डी. काम करीत आहेत. सीमाप्रश्‍नाची अस्वस्थता मात्र त्यांच्या मनात आजही कायम आहे. मराठी भाषिकांची सोडवणूक करण्यासाठी अखंडपणे त्यांनी काम केले आहे. ते उच्च प्रकारचे व्यक्तिमत्त्व असून, सीमावासीयांच्या प्रेमाचा ओलावा त्यांना मिळाला आहे. यापुढेही त्यांचे विचार सामाजिक मन घडवत राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

या वेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदिवडेकर, माजी आमदार के. पी. पाटील, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे, वैभव नायकवडी, ए. वाय. पाटील, डॉ. जे. एफ. पाटील, डॉ. भालबा विभुते, भय्या ऊर्फ प्रताप माने, व्ही. बी. पाटील, माजी प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, डॉ. क्रांतीकुमार पाटील, माजी महापौर आर. के. पोवार, माजी नगरसेवक आदिल फरास, ग्रंथपाल नमिता खोत, उपस्थित होते. डॉ. बी. ए. खोत यांनी प्रास्ताविक केले. 

मंत्रिमंडळातही एन.डीं.ची छाप
श्री. पवार म्हणाले, की विधिमंडळात १९७८ मध्ये काँग्रेसमध्ये मतभेद झाले. त्या वेळी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील होते. मी मंत्रिमंडळातून बाहेर पडलो आणि राज्याची धुरा माझ्याकडे आली. नव्या मंत्रिमंडळाची यादी करताना एन. डी. यांच्या नावासाठी सर्व जण आग्रही होते. त्यांनी त्यास संमती दिली आणि त्यांच्याकडे सहकार खात्याचे काम दिले. अनेकदा त्यांची भाषणे ऐकली होती. मात्र, मंत्रिमंडळ व प्रशासनात त्यांनी कामाची छाप पाडली. काम हातात घेतलं की ते १०० टक्के पूर्ण करण्याची त्यांची हातोटी राहिली. 

विचारांचा मधूघट रिता होणार नाही...
एन. डी. शंभरी नक्कीच गाठतील. त्यांचा दिवस कधी ढळणार नाही. विचारांचा मधूघटही कधी रिता होणार नाही, असे सांगत श्री. पवार म्हणाले, की माझ्या बहिणीला एन.डीं.ना कधी-कधी थांबा म्हणून सांगावे लागते. पण, ते हवे त्या पद्धतीने जीवन जगणारे आहेत. आमच्याकडून काही चूक झाली तर झोडतीलही. 

व्हीप चालला नाही
एन.डी. हे माझे मेहुणे. बहिणीचे यजमान. मी मंत्री असताना ते विरोधी पक्षाचे नेते. त्यादरम्यान कठीण प्रसंग आले. आमचा ‘व्हीप’ त्यांच्यासमोर चालला नाही, असे त्यांनी मनमोकळेपणे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Gargai Dam Project : गारगाई प्रकल्पाला येणार वेग; मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी

PSL vs IPL : पाकिस्तान करणार धरमशालाची कॉपी; PSL ला IPL सारखी झळाळी देण्यासाठी सुरू केली धडपड

SRH vs LSG Live Score : तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

जेपी नड्डा, अमित मालवीय यांना 'आक्षेपार्ह पोस्ट' प्रकरणी पोलिसांचे समन्स, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT