करकंब (सोलापूर) : पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठ्या करकंब ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरु झाली असून, सख्ख्या दोन भावांच्या लढतीत तिसरी आघाडीची उडी घेण्यासाठी चाचपणी करत असल्याने येथे तिरंगी लढत होणार का? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
करकंब येथे मारुती देशमुख आणि नरसप्पा देशमुख या दोन सख्ख्या भावांचे परस्परविरोधी राजकीय गट आहेत. सध्या ग्रामपंचायत नरसाप्पा देशमुख गटाच्या ताब्यात असून, त्यांचे पुत्र आदिनाथ देशमुख हे सरपंच आहेत. दुसरीकडे मारुती देशमुख यांनी सलग दोनवेळा जिल्हा परिषद गटावर वर्चस्व राखले असून, त्यांची सून रजनी देशमुख यांनी अडीच वर्षे महिला आणि बालकल्याण समितीचे सभापतीपद भूषविले आहे. त्यामुळे हे दोन्ही गट आपापल्या सत्तास्थानावरुन केलेल्या विकासकामांच्या जोरावर जनतेसमोर जात आहेत. दुसरीकडे पुरवत गटाचे राहुल पुरवत यांनी प्रथम आदिनाथ देशमुख यांच्याशी जुळवून घेत पत्नी सारिका पुरवत यांच्या गळ्यात उपसरपंचपदाची माळ पाडून घेतली होती. मात्र पंचायत समितीच्या निवडणुकीत बाळासाहेब देशमुख यांच्याशी सलगी करत उमेदवारी मिळवून निवडूनसुद्धा आले आहेत.
हे ही वाचा : निवडणूक आयोगाचा दणका ! 16 ग्रामपंचायतीच्या 144 उमेदवारांवर घातले निवडणूक लढविण्यावर निर्बंध
सध्या ग्रामपंचायतीसाठीही ते त्यांच्याच सोबतीने लढण्याच्या तयारीत दिसत आहेत. दुसरीकडे यावर्षी प्रथमच निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण निघणार असल्याने पार्टी प्रमुखांमध्ये संभ्रमावस्था दिसत आहे. एरव्ही सरंपचपदाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणारे पार्टी प्रमुख यावेळी मात्र चाचपडताना दिसत आहेत. यावेळी त्यांना प्रत्येक प्रवर्गाचा उमेदवार निवडून आणण्याची कसरत करावी लागणार आहे. सहा प्रभागातून १७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविताना सध्या योग्य उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. १७ उमेदवारांमध्ये पाच सर्वसाधारण पुरुष, पाच सर्वसाधारण महिला, इतर मागासवर्ग दोन पुरुष व तीन महिला आणि अनुसुचित जाती एक पुरुष व एक महिला प्रवर्गासाठी आरक्षण आहे.
तिसरी आघाडीच्या भुमिकेकडे लक्ष
सध्या गावातील काही मंडळींनी एकत्रित येत तिसरी आघाडी स्थापन करुन स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यासाठी लोकांच्या गाठीभेटींवर जोर दिला आहे. मात्र त्यांना सहा प्रभागांमधून १७ उमेदवार देताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. दुसरीकडे दोन्ही गटांकडून तिसऱ्या आघाडीतील प्रमुखांशी हातमिळवणी करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे तिसरी आघाडी निवडणूक रिंगणात उतरणार की कोणत्या एका गटाशी हातमिळवणी करणार, याविषयीही उत्सुकता लागून राहिली आहे. शेवटी खरे चित्र हे अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच चार जानेवारी रोजीच स्पष्ट होणार आहे.
प्रभागनिहाय मतदान
प्रभाग एक - पुरुष- 1,121, स्त्री- 1,036, एकूण- 2,157
प्रभाग दोन - पुरुष- 973, स्त्री- 794, एकूण - 1,767
प्रभाग तीन - पुरुष- 1,059, स्त्री- 880, एकूण - 1,939
प्रभाग चार - पुरुष- 1,145, स्त्री- 1,123, एकूण - 2,268
प्रभाग पाच - पुरुष- 1,269, स्त्री- 1,078, एकूण - 2,347
प्रभाग सहा - पुरुष- 1,735, स्त्री- 1,556, एकूण - 3,291
-------------------------------------------------------------------
एकूण मतदान- पुरुष - 7,302, स्त्री- 6,467, एकूण- 13,769
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.