सोलापूर : रेल्वेतील कागदाचा वापर कमी करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा अवलंब करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकण्यात आले आहे. करंट चार्ट तयार झाल्यानंतर देखील प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळणार आहे. ही सुविधा सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्सप्रेस, हसन एक्स्प्रेस, उद्यान एक्स्प्रेस पुणे-नागपूर गरीब रथ, मुंबई-लातूर एक्सप्रेसमधील तिकीट पर्यवेक्षकांना एचएचटी (हॅन्ड हेल्ड टर्मिनल) मशीन प्रथमत: देण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ सूत्रांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या रेल्वे तिकीट परीक्षकांना (टीटीई) कागदावर छापलेला आरक्षण तक्ता बाळगावा लागणार नाही. आरक्षण स्थिती तपासण्यासाठी आणि पुढील आरक्षण स्थितीची माहिती देण्यासाठी सोलापूर विभागात तिकीट पर्यवेक्षकांना १४२ मशीन देण्यात येणार आहेत. तिकीट तपासण्यासाठी किंवा सीट वाटप करण्यासाठी आता कागदी तक्त्याची गरज भासणार नाही. विभागातील मेल, एक्सप्रेस गाड्यांसाठी १४२ मशिन वापरण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
हॅड हेल्ड टर्मिनल्स अर्थात (एचएचटी) वितरण सुरू होणार आहे. मशीन रेल्वे सर्व्हरशी जोडली जाणार आहे. ज्यामध्ये एक ४ जी चे सिम कार्ड असणार आहे. याद्वारे रेल्वे तिकीटाचे प्रत्येक अपडेट तत्काळ प्रवाशांना समजणार आहेत. सोलापूर विभागातून धावणाऱ्या सिद्धेश्वर एक्सप्रेस, हसन एक्सप्रेस, पुणे-नागपूर गरीबरथ, गदग-मुंबई एक्सप्रेस, उद्यान एक्स्प्रेसमध्ये पहिल्या टप्यात याची सुविधा सुरू होणार आहे. टर्मिनल मशिनद्वारे ऑनलाइन चार्टद्वारे सीटची उपलब्धता, तिकीट तपासले जाणार आहेत. प्रवाशांशी संबंधित सर्व समस्यांची नोंदही तिकीट परीक्षकांना अर्थात टीटीईला हॅड हेल्ड टर्मिनल मशीनमध्ये करता येणार आहे. यात पाणी, वीज, अस्वच्छता, बेडरोल, टॉयलेट, आजारी रुग्ण यासंबंधीची माहितीही नोंदवली जाणार आहे.
ठळक बाबी...
हे आहेत टर्मिनलचे फायदे
रेल्वे सुटल्यानंतर, कोणतेही तिकीट रद्द झाल्यास, तिकीट पर्यवेक्षकांना माहिती कळेल
रेल्वे सर्व्हरशी असणार कनेक्ट
प्रतीक्षा करणाऱ्यांना निश्चित सीट मिळेल
रद्द केलेल्या तिकिटांच्या परताव्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल
तिकीट पर्यवेक्षकांवर निर्माण होणारे प्रश्नही कमी होतील
सीट वाटपात पारदर्शकता निर्माण होणार
रेल्वे प्रवाशांना अधिक सुविधा देण्याचे काम केले जात आहे. याअंतर्गत रेल्वे विविध प्रयोग करत आहे. या प्रणालीमुळे आरक्षीत तिकीट प्रवाशांना मिळेल. त्याचबरोबर जागांच्या उपलब्धतेची अचूक माहिती उपलब्ध होणार आहे. येत्या महिन्यात ही यंत्रणा वरील गाड्यांमध्ये सुरु होणार आहे.
- प्रदीप हिरडे,वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.