पलूस - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव पांडुरंग पुदाले (वय 85) यांचे आज पहाटे अल्पश: आजाराने निधन झाले. पलूस स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. 14) सकाळी 10 वाजता पलूस येथे आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पलूस बॅंकेचे अध्यक्ष वैभवराव पुदाले व नगरपालिकेचे गट नेते सुहास पुदाले यांचे ते वडील, तर सोनाई चॅंरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गणपतराव पुदाले यांचे ते चुलते होत.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष, वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, तासगाव पंचायत समिती सभापती, तासगाव बाजार समितीचे सभापती, पलूस बॅंकेचे अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे सदस्य, पलूस ग्रामपंचायतीचे सरपंच , पलूस तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष अशा विविध पदावर त्यांनी काम केले.
स्व . वसंतदादा पाटील यांचे ते विश्वासू सहकारी होते. स्व. आमदार बाबासाहेब पाटील, दिनकर आबा पाटील यांच्या बरोबर त्यांनी काम केले. स्व .आमदार डॉ. पतंगराव कदम यांचेही ते विश्वासू सहकारी होते.
संयमी , अभ्यासू नेता हरपला
सहकार ,सामाजिक ,राजकिय क्षेत्रात वसंतराव पुदाले यांचे कार्य मोठे आहे. स्व. आमदार डॉ. पतंगराव कदम यांचे ते विश्वासू सहकारी होते. संयमी, अभ्यासू नेता हरपला.
- आमदार डॉ. विश्वजित कदम
काँग्रेसशी एकनिष्ठ
वसंतराव पुदाले यांनी सर्व क्षेत्रात प्रामाणिक काम केलेच. मात्र, काहीही झाले तरी कॉंग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले.
- आमदार मोहनराव कदम
दादा घराण्यावर श्रद्धा
वसंतराव पुदाले यांनी वसंतदादांच्या बरोबर काम केलं. दादानंतर स्व . प्रकाश बापूंना साथ दिली. संयमी, प्रामाणिक, अभ्यासू नेता म्हणून त्यांची प्रतिमा होती. दादा घराण्यावर त्यांची श्रद्धा होती.
- माजी केंद्रीय राज्य मंत्री प्रतिक पाटील
सर्व सामान्य लोकांशी नाळ
वसंतराव पुदाले हे संयमी नेते होते. गोरगरीब, सर्वसामान्य जनतेशी त्यांची नाळ जोडली होती.
- अरुण आण्णा लाड
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.