भोसरी, ता. ३० ः भोसरी, इंद्रायणीनगर आणि दिघी परिसरात १५ ते २० वर्षांपूर्वीच्या सांडपाणी वाहिन्या आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत त्यांची वहन क्षमता कमी झाल्याने निरनिराळ्या भागांतील चेंबर तुंबून त्यातून दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. नागरी वस्तीत दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांचे घरी बसणे अवघड झाले आहे. याशिवाय त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून वाहनचालक आणि नागरिकांच्या समस्यांतही वाढ झाली आहे.
भोसरीतील दिघी रस्त्यावरील गंगोत्री पार्कमध्ये बॅडमिंटन हॉलच्या पाठीमागील रस्त्यावरील चेंबर गेल्या सतरा दिवसांपासून तुंबलेल्या स्थितीत आहे. तर पुणे - नाशिक महामार्गावरील पीएमपीएमएलच्या सदगुरू डेपो चौकाजवळील चेंबर गेल्या कित्येक वर्षांपासून वारंवार तुंबून त्याचे सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. दिघीतील भारतमातानगर येथील गायरानातून आळंदी रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यावर गेल्या एक महिन्यापासून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर जमा होत आहे. त्याचप्रमाणे पावसाळ्यात दिघीतील संभाजीनगर, मशीद मार्गावरील चौधरी पार्क कॉलनी क्रमांक दोनजवळही गटार वारंवार तुंबण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे ही समस्या तातडीने सोडविण्याची मागणी वाहनचालक आणि नागरिकांमधून होत आहे.
आणखी कुठे तुंबतात चेंबर ?
- भोसरीतील शांतीनगर कॉलनी क्रमांक एक समोरील रस्त्यावर
- भोसरीतील खंडोबा माळमधील लक्ष्मी शिंदे चाळीजवळ
- इंद्रायणीनगरातील पेठ क्रमांक दोनमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक, पेठ क्रमांक तीन श्रीकृष्ण पूरम सोसायटीमागील इ क्षेत्रीय कार्यालयाकडे जाणारा रस्ता व ग्लोरिअस पार्क सोसायटीच्या मागील बाजूकडील रस्ता
- वैष्णोमाता शाळेसमोरील प्रकाश निलय सोसायटीजवळ
तुंबलेल्या चेंबरमुळे समस्या...
- दुर्गंधीयुक्त पाणी वाहनांमुळे अंगावर उडत असल्याने वाहनचालक, पादचारी त्रस्त
- दुर्गंधीयुक्त पाण्याने त्वचा रोगाची शक्यता, परिसराचे विद्रूपीकरण
- रस्त्यावर गटाराचे पाणी साचल्याने दुचाकीचालकांच्या अपघाताची शक्यता
- नागरी वस्तीत दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांचे घरी बसणे अवघड
पेठ क्रमांक सहामधील आदिवासी मुलांचे वसतीगृह येथील गटाराचे चेंबर वारंवार तुंबत आहे. मैलापाणी रस्त्यावरून वाहून दुर्गंधी पसरत आहे. वाहनांमुळे दुर्गंधीयुक्त पाणी अंगावर उडत आहे. ही समस्या पिंपरी चिंचवड महापालिकेने कायमस्वरूपी सोडविली पाहिजे.
- गिरीश वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते, इंद्रायणीनगर, भोसरी
गंगोत्री पार्कमधील बॅडमिंटन हॉलच्या पाठीमागील सांडपाणी वाहिनी गेले वर्षभर वारंवार तुंबत आहे. गेल्या सतरा दिवसांपासून तुंबलेल्या चेंबरमधून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून वाहत आहे. येथील नागरिकांनी महापालिकेशी संपर्क साधूनही दुरुस्ती होत नसल्याकारणाने सोसायटीद्वारे दोन हजार रुपये खर्च करून गुरुवारी (ता. २६) चेंबरचे चोकअप काढण्यात आले. तरीही ही समस्या सुटलेली नाही. दुर्गंधीमुळे घरात थांबणे अवघड झाले आहे.
- दीपिका शिंदे, स्थानिक रहिवासी, गंगोत्री पार्क, दिघी रस्ता
गेल्या एक महिन्यापासून दिघीतील भारतमातानगर ते गायरानातून आळंदी रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यावर चेंबर तुंबून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून वाहत आहे. मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे रस्त्याचे तळे झाले आहे. पाणी वाहनांमुळे अंगावरही उडत आहे. त्यामुळे पायाला खाज येऊन त्वचा रोग होण्याची भीती आहे.
- प्रल्हाद मराठे, वाहन चालक
पावसाळा सुरू असल्याने खोदकाम करता येत नाही. मात्र, तुंबणाऱ्या चेंबरचे चोकअप काढण्याबरोबरच दुरुस्तीचीही कामे केली जात आहेत. डीआरए संस्थेच्या सर्वेक्षणाप्रमाणे जुन्या सांडपाणी वाहिन्या बदलणे, एसटीपी प्लांट, पंपिंग स्टेशनसह इतरही जलनिस्सारणची कामे करण्यासाठी ‘इ’ प्रभागासाठी दोनशे ८२ कोटी; तर ‘क’ प्रभागासाठी २३३ कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. सध्या ‘इ’ आणि ‘क’ प्रभागातील जलनिस्सारणची कामे करण्यासाठी महापालिकेद्वारे प्रत्येकी नऊ कोटी
रुपयांची तरतूद केली आहे. येत्या दोन महिन्यांत या प्रभागातील जलनिस्सारणाची कामे करण्यासाठी निविदेचे काम पूर्ण करण्यात येईल.
- राजेंद्र डुंबरे, उपअभियंता, जलनिस्सारण, ‘क’ व ‘इ’ प्रभाग, पिंपरी चिंचवड महापालिका
BHS25B03057, BHS25B03058
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.