इंदोरी, ता. ६ : आदर्श ग्राम कान्हेवाडी (तर्फे चाकण) ग्रामपंचायतीच्यावतीने ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत गायरान जमिनीवर शेवग्याची पाचशे रोपे लावण्यात आली. पर्यावरण जपण्यासह फळझाडे व शेवग्यापासून ग्रामपंचायतीला चांगले आर्थिक उत्पन्नही मिळते. शिवाय शासकीय जमिनीवर होणाऱ्या अतिक्रमणालाही आळा बसतो, असे सरपंच स्वाती येवले यांनी सांगितले. शेवगा लागवडीवेळी येवले यांच्यासह उपसरपंच ओमेश्वरी ढोरे, माजी आदर्श सरपंच भाऊसाहेब पवार, ग्रामपंचायत सदस्य राहुल येवले, भारती खैरे, आत्माराम कडलक व सुवर्णा ढोरे उपस्थित होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थी, तसेच ग्रामस्थ, युवक, महिला बचत गट व पर्यावरण दूत यांचे सहकार्याने शेवगा लागवड करण्यात आली. या उपक्रमाचे नियोजन ग्रामपंचायत अधिकारी सुप्रिया सांडभोर, लिपिक भाग्यश्री येवले व महादू येवले यांनी केले.
PNE25V37727