लोणावळा, ता. १९ : खोल दऱ्या, पाणथळ भाग आणि दुर्गम परिसरांत जीवाची पर्वा न करता बचावकार्य करणाऱ्या ‘शिवदुर्ग रेस्क्यू टीम लोणावळा’ला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी महत्त्वपूर्ण मदत प्रदान केली. बचावासाठी आवश्यक असणारे दोर, सुरक्षा साहित्य आणि विविध उपकरणे टीमकडे सुपूर्द करण्यात आली.
ही मदत पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या हस्ते शिवदुर्ग रेस्क्यू टीमचे सुनील गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांना देण्यात आली. यावेळी महेश मसने, राजेंद्र कडू, चंद्रकांत गाडे तसेच पोलिस कर्मचारी उपस्थित होते. २०२५ च्या गणेशोत्सवात नियोजनातून बचत केलेल्या ५१ हजार रुपयांच्या निधीतून हे साहित्य खरेदी करण्यात आले.
दुर्गम भागातील पर्यटकांची सुटका, आपत्तीवेळचा तातडीचा प्रतिसाद आणि धाडसी बचाव मोहिमा यासाठी ओळखल्या जाणाऱ्या शिवदुर्ग टीमसाठी ही मदत मोठा आधार ठरणार आहे. पोलिसांच्या या सामाजिक पुढाकाराचे परिसरात कौतुक होत आहे.
LON25B04912