मोशी, ता. ३ : मोशी प्राधिकरणातील पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) शेजारील मोकळ्या जागेत लावलेली १०० हून अधिक झाडांपैकी निम्मी झाडे पाण्याअभावी सुकलेली आहेत. तर तेवढीच म्हणजे सुमारे १०० झाडांची रोपे थर्माकोलच्या बॉक्समध्ये पडून आहेत.
आरटीओ कार्यालयाच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत काही महिन्यांपूर्वी विविध प्रकारची देशी, औषधी झाडे लावण्यात आली. त्यामध्ये पांढरा बकुळ, पिवळा कांचन, सिंधी काटे, साबर, पिंपरण, रोहितक, कौशी, मोह, खैर, आवळा, अशा असंख्य वृक्षांचा समावेश आहे. त्यांना नियमित पाणी मिळावे म्हणून ठिबक सिंचन योजनेची व्यवस्था करण्यात आली. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून ठिबक सिंचनातून पाणीच सोडले गेले नसल्यामुळे अनेक झाडे सुकलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत, तर काही झाडे मरणासन्न स्थितीत आहेत.
विशेष म्हणजे याच जागेत आणखी काही नवीन रोपे आणण्यात आली. मात्र त्यांची लागवड न करता ती रोपे महिनोनमहिने वृक्षारोपणाअभावी येथेच पडून आहेत. जमिनीवर आणि थर्माकोलच्या बॉक्समध्ये ठेवलेली ही रोपे पाण्याअभावी निष्प्राण होत चालली आहेत. रोपे लावणे महत्त्वाचे आहेच. पण ती जगवणे त्याहून महत्त्वाचे आहे, अशी भावना पर्यावरणप्रेमी नागरिक व्यक्त करत आहेत.
झाडावर कुऱ्हाड
यापूर्वी या झाडांच्या जागेभोवती तारेचे कुंपण होते. मात्र, सध्या तेही गायब झाले असून त्यामुळे मोकाट जनावरे व असामाजिक घटकांचा धोका वाढला आहे. एका कोपऱ्यात विद्युत करवतीने कापून ठेवलेले सागवान सदृश्य झाडही आढळून आले आहे, ही बाब चिंताजनक असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.
याबाबत आमच्याकडे अधिकृत माहिती नाही. मात्र, अनेक पर्यावरणप्रेमी सामाजिक संस्था येथे वृक्षलागवड करीत असतात. कदाचित त्यांच्यापैकीच कोणी ही झाडे लावली असतील. उर्वरित रोपे तिथेच राहिली असतील. तरीही आम्ही ही रोपे व झाडे जगविण्यासाठी पाणीपुरवठा व लागवडीची व्यवस्था करू.
- राजेंद्र वसवे, उद्यान निरीक्षक, उद्यान विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.