जुनी सांगवी, ता. २८ ः जुनी सांगवी परिसरात रस्ते मोठे असूनही बेकायदा पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होत आहे. पदपथही झाकले जात आहेत. अंतर्गत गल्ल्यांमधूनही हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्याच्याकडेला दुतर्फा लावली जात आहे. एखादी आगीची घटना किंवा आपत्कालीन घटना घडल्यास मदतकार्य पोचण्यासाठी बेकायदा पार्किंगच्या अडथळ्यांचे दिव्य पार करावे लागते.
जुनी सांगवीत संविधान चौक ते शितोळेनगर पी. डब्ल्यू. डी. कॉर्नर, मधुबन सोसायटी रस्ता, मुळा नदी किनारा रस्ता, गजानन महाराज मंदिरासमोरील मैदान या जागेवर दिवसेंदिवस जादा संख्येने वाहने उभी केली जात आहेत. परिणामी, रस्ते रहदारीसाठी की पार्किंगसाठी ? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.
अनेकदा काही वाहने अनेक दिवस एका जागी थांबलेली असतात. मधुबन सोसायटी परिसरालाही मुख्य एकच रस्ता असल्याने सणउत्सव काळात नागरिकांना रहदारीचा त्रास सहन करावा लागतो. पर्यायी रस्ता नसल्याने या भागातील सर्व वाहतूक एका रस्त्यावरून करावी लागते. रस्त्याला दुतर्फा लावलेल्या वाहनांमुळे नागरिकांना कोंडीचा त्रास सहन करावा लागतो.
जुनी सांगवी, सांगवी फाटा, पिंपळे गुरव, दापोडी, नवी सांगवीला जोडणाऱ्या संविधान चौक ते शितोळेनगर महाराष्ट्र बॅंक चौक या प्रमुख रस्त्याचे काही वर्षांपूर्वी स्मार्ट सिटी अंतर्गत रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. रस्ता मोठा झाल्याने वाहतूक सुरळीत सुरू झाली. मात्र, येथेही दुतर्फा खासगी वाहने, जड वाहनांच्या पार्किंगची मक्तेदारी सुरू झाल्याने रस्ता रहदारीस अपुरा पडत आहे.
दुतर्फा पार्किंगने अडथळा
मुळा नदी किनारा रस्त्याचे २०१२ मध्ये रुंदीकरण करण्यात आले. मात्र, रस्ता मोठा होऊनही दुतर्फा लावण्यात येणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या रस्त्याचा पुणे, औंधकडे ये- जा करण्यासाठी मोठा वापर केला जातो. या रस्त्यावर शाळा, हॉटेल, भंगार मालाची दुकाने, किराणा दुकाने, वॉशिंग सेंटर असल्याने या रस्त्यावर मोठी वर्दळ असते.
ओपन जिमसाठी ‘कसरत’
याच रस्त्याकडेला पदपथावर ओपन जिम साहित्य बसविण्यात आलेले आहे. व्यायामप्रेमी मंडळींना रस्ता ओलांडून पदपथांवर असणाऱ्या ओपन जिमकडे ये- जा करण्यासाठी जिकिरीचे झाले आहे. वाहनांच्या रांगांमधून वाट काढत नागरिकांना व्यायामासाठी जावे लागते. पलीकडे या रस्त्यावरूनच संत सावतामाळी उद्यानात जाण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागते. मुख्य रस्ता, बाजार पेठ, हॉटेल, फर्निचर, हार्डवेअर दुकाने, बॅंक असल्याने या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. सांगवी वाहतूक पोलिसांकडून येथे अनेकदा कारवाई ही करण्यात आली. मात्र, पुन्हा जैसे थे परिस्थिती आहे.
प्रशस्त रस्ते ही सांगवीची ओळख आहे. मात्र, बेकायदा पार्किंगमुळे सध्या कोंडी होत आहे. वाहनचालकांनी रस्त्याला अडथळा होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. प्रशासनाकडूनही परिसरात अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जावी.
- रुपेश पुजारी, नागरिक
‘‘सण- उत्सव मिरवणूक काळात एक दिवस आधीच रस्ता मोकळा ठेवण्यासाठी विनंती करावी लागते. नागरिक सहकार्य करतात. मात्र, नेहमीच्या पार्किंगमुळे कोंडीचा त्रास सहन करावा लागतो.
- धम्मरत्न गायकवाड, नागरिक
जुनी सांगवी भागात आमच्याकडून नियमित कारवाई सुरू आहे. रहदारीस अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल.
- प्रदीप पाटील, पोलिस निरीक्षक, सांगवी वाहतूक विभाग
PIM25B20146
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.