पिंपरी, ता. १ : पुनावळेतील काटे वस्ती भागात खराब रस्त्यावरून दुचाकी घसरून ट्रेलर खाली आल्याने महिलेचा मृत्यू झाल्यानंतर येथील खराब रस्ते आणि अवजड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या परिसरातील खड्ड्यांमुळे येथे वाहने चालविणे जिकिरीचे झाले आहे. अशातच अवजड वाहतुकीमुळे अपघात होत आहेत. त्यामुळे रस्त्याची स्थिती सुधारण्यासह या भागात दिवसा अवजड वाहनांना येण्यास बंदी घालावी, अशी मागणी पुनावळेकरांनी महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडे केली आहे. या आशयाचेतसेनिवेदन नागरिकांनी महापालिका स्थापत्य विभाग आणि वाहतूक विभागाला दिले आहे.
बुधवारी (ता.३०) दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित महिलेचे पुनावळेमध्ये छोटे दुकान आहे. काटेवस्ती चौकात ट्रेलरला ओलांडत असताना तिची दुचाकी घसरली आणि ट्रेलरखाली आली. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. मागील महिन्यातच ताथवडे येथील भुयारी मार्गालगत एका डंपरने धडकेने दुचाकीस्वार महिलेला आपला पाय गमवावा लागला होता. वारंवार होणारे अपघात आणि त्यांची तीव्रता लक्षात घेता येथील रस्ते त्वरित दुरुस्त करावेत, गतिरोधक उभारावेत आणि जड वाहनांना दिवसा बंदी घालावी, अशी मागणी जोर धरत आहे.
खराब रस्त्यांचे ग्रहण सुटेना
दरवर्षी पावसात पडणारे खड्डे, त्यावरील तात्पुरती मलमपट्टी, सेवा रस्त्याचे रखडलेले काम, खराब अंतर्गत रस्ते, त्यामुळे पावसाळ्यात होणारा चिखल अशी परिस्थिती गेल्या कित्येक वर्षांपासून पुनावळ्यात दिसून येत आहे. येथील मंजूर झालेल्या डीपी रस्त्यांचे कामही अत्यंत संथगतीने सुरू आहे. परिणामी, दररोज बाहेर पडणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरूनच बाहेर पडावे लागत आहे.
पुनावळे भागामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून खराब रस्त्यांचा प्रश्न सुटलेला नाही. खराब रस्ते अवजड वाहतूक आणि रस्त्यांच्या विकासकामात होणारी दिरंगाई याचा परिणाम आता नागरिकांच्या जीवितावरही होऊ लागला आहे. अनेक शहरांमध्ये रहिवासी भागात अवजड वाहनांना दिवसा बंदी घातली जात आहे. पुनावळ्यातही हा नियम लागू करावा, अशी मागणी केली आहे. त्यावर अजून तरी कोणताही आदेश आलेला नाही. मात्र, प्रशासन याची दखल घेईल याची आम्हाला अपेक्षा आहे.
- सुमीत ढगे, मी पुनावळेकर मोहीम
जेथे अपघात झाला त्या भागात अनेक शाळा आहेत. त्यामुळे येथे शालेय वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. अनेक पालक मुलांना सोडण्यासाठी आणि घेण्यासाठी दुचाकीवरून जात असतात. या अपघातानंतर दुचाकी घेऊन बाहेर जाण्याचीही महिलांना भीती वाटत आहे.
- विठ्ठल बरळ, रहिवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.