पिंपरी, ता. २४ : अपघात रोखण्यासाठी जड आणि अवजड वाहनांच्या वेगावर मर्यादा, वाहतूक नियमांविषयी जागरूकता आणि चालकांसाठी प्रशिक्षण शिबिरे घेण्यासह विविध नियम करण्यात आले आहेत. नियम मोडणाऱ्या वाहनांबाबत कडक कारवाई करण्याचे निर्देश पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले.
यासंदर्भात पोलिस आयुक्तालयात सोमवारी (ता. २४) बैठक झाली. चौबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला पीएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, अप्पर पोलिस आयुक्त सारंग आव्हाड, वाहतूक उपायुक्त विवेक पाटील आदींसह आरटीओ अधिकारी आणि ‘फोरम फॉर आयटी एम्प्लॉइज’चे पदाधिकारी उपस्थित होते. अपघात रोखण्यासाठी रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लॅन्टबाबतही काही निर्णय घेण्यात आले.
बैठकीतील उपायांच्या अंमलबजावणीसाठी आरटीओ, वाहतूक विभाग, स्थानिक पोलिस संयुक्तरीत्या आरएमसी प्लॅन्टच्या ठिकाणीच उपक्रम राबवणार आहेत. डंपर, मिक्सरचे अपघात कमी करण्यासाठी चालकाच्या जोडीला सहचालक अनिवार्य करण्याचाही निर्णय झाला. मागील चाकांखाली वाहने सापडून होणारे अपघात टाळण्यासाठी साइड बंपर, चाकाला कव्हर आणि कॅमेरे लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी आरटीओमार्फत होईल.
ही कारवाई लागू झाल्यास शहरातील जड वाहनांमुळे होणारे अपघात मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
---
प्रमुख निर्णय
- आरएमसी प्लॅन्ट ः १) नियमबाह्य प्लॅन्ट चालकांना पीएमआरडीएमार्फत काम बंद करण्याच्या नोटिसा बजावणार,
२) विनापरवाना प्लॅन्टवर निष्कासनाची कठोर कारवाई होणार
- जड, अवजड वाहने ः १) वेगमर्यादा ताशी ३० किमी,
२) जीपीएस मॉनिटरिंग सिस्टम व स्पीड गनच्या मदतीने वेगमर्यादेच्या पालनाची काटेकोर तपासणी,
३) वाहन आणि चालकांची संयुक्त सुरक्षा तपासणी,
४) वाहनांची तांत्रिक सुरक्षा तपासणी,
५) चालकांच्या परवान्यांची पडताळणी
६) चालकांसाठी वाहतूक नियमांविषयी जागरूकता व प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन
---
निर्बंध स्वागतार्ह
‘फोरम फॉर आयटी एम्प्लॉइज’च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, आज बैठकीत जे निर्णय झाले आहेत, त्या उपाययोजना लागू करण्याची मागणी आम्ही आधीपासूनच करीत होतो. आता हे निर्बंध लागू झाले, ही स्वागतार्ह बाब आहे. अपघात होऊच नयेत म्हणून प्रवासी वाहनांप्रमाणे अवजड वाहनांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काही बदल करणे अपेक्षित आहे.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.