पीतांबर लोहार ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १६ : इंग्रज राजवटीतून देशाला स्वातंत्र्य मिळाले. भारत-पाकिस्तान अशी फाळणी झाली. सिंध प्रांताचा समावेश पाकिस्तानात झाला. तेथील नागरिकांनी भारताची निवड केली आणि निर्वासित म्हणून भारतात आले. त्यांच्यासाठी एक कॅम्प पिंपरीत उभारला. तोच आजची मुख्य बाजारपेठ पिंपरी कॅम्प. त्यालगत सिंधी बांधवांचे श्रद्धास्थान इष्टदेवता झुलेलाल व ज्योत यांची मंदिर आहेत. छतुराम महाराज यांनी १९४८ मध्ये आणलेली ती ज्योत आजही तेवत आहे. तिचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे. त्या ज्योतीचे दर्शन घेतल्यानंतरच सिंधी बांधव आपल्या नित्यकर्माला सुरवात करतात.
पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीची मुख्य बाजारपेठ म्हणून पिंपरी कॅम्प ओळखला जातो. पिंपरी रेल्वे स्थानकाला लागून असलेला हा परिसर. कॅम्प उभारला तेव्हा शेती होती. मोकळी जागा होती. काहींचे गोठे होते. कौलारू चाळ उभारली होती. त्यात सिंधी नागरिकांना आश्रय मिळाला. त्यात सिंधमधील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र झुलेलाल मंदिरातील एक पुजारीही होते. त्यांनी तेथील मंदिरात तेवणाऱ्या दिपातून एक ज्योत सोबत आणली होती. तिच्यासाठी छोटे मंदिर बांधले. त्यात आजही ती ज्योत तेवत आहे, अखंडपणे आणि ती आणणारे पुजारी होते बाबा छतुराम. तिचे भक्तिभावाने प्रत्येक सिंधी बांधव दर्शन घेत आहेत. आता या मंदिराच्या परिसरात मोठे मंदिर बांधले आहे. झुलेलाल महाराज यांची मूर्ती मंदिरात आहे. तळमजला व पहिला मजला अशी मंदिराची रचना आहे. शेजारी छोटेसे नवग्रह मंदिर आहे. या तीनही ठिकाणी मूळज्योतीपासून तेजोमय केलेल्या ज्योती अखंडपणे तेवत आहेत. तळमजल्यावर एक विहीर आहे. त्या विहिरीतील पाण्याची पूजाही नित्यपणाने केली जाते. तीर्थ म्हणून पाणी श्रद्धेने घेतले जाते.
अशी आहे आख्यायिका
सिंधू नदीच्या परिसरातील सिंध प्रांत. तेथील नागरिक जल व ज्योत यांनाच देव मानतात. झुलेलाल ही त्यांची इष्टदेवता. त्यांना जलदेवतेचे अवतार मानले जाते. जल हेच जीवन आहे, असे मानून ‘जल’ आणि ‘ज्योती’ या इष्ट देवतांवर त्यांची नितांत श्रद्धा. ‘जिओ और जिने दो’, ‘विश्वात सुख, शांती व प्रेम असू दे’ हा झुलेलाल यांचा संदेश. तोच आधार घेऊन बाबा छतुराम यांनी सिंध प्रांतामधून ती ज्योत पिंपरीपर्यंत आणली आहे. आजही ती अखंडपणे तेवत आहे.
अमृतमहोत्सवी ‘ज्योत’
साधारण १९४८ मध्ये सिंधी बांधव पिंपरीत आले. त्याच वेळी बाबा छतुराम यांनी ‘ज्योत’ आणली व तिचे छोटेसे मंदिर उभारले. त्या शेजारीच बाबा झुलेलाल यांचेही मंदिर उभारले आहे. आज या घटनेला ७५ वर्षे होत आहेत. अर्थात या ज्योत मंदिराचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे.
‘जल’ आणि ‘ज्योत’ आमच्या इष्टदेवता आहेत. सिंध समाजात त्यांना अधिक महत्त्व आहे. बाबा झुलेलाल हे जलदेवतेचे अवतार आहेत. ते अंतर्धान पावले ते ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे. मात्र, देशाच्या फाळणीच्या वेळी सिंध प्रांत पाकिस्तानात गेला आणि सिंधी लोकांनी भारताला पसंती दिली. तेव्हा त्या मंदिरातून बाबा छतुराम यांनी आणलेली ज्योत आजही अखंडपणे तेवत आहे.
- जवाहर कोटवानी, सचिव, बाबा छतुराम लाल मंदिर ट्रस्ट, पिंपरी.
‘पिंपरी-चिंचवड गाव ते महानगर’ हे पुस्तकाचे लेखन करत असताना शहरातील सर्व उपनगरांची माहितीचा समावेश केला. त्यात सिंध प्रांतातून आणून पिंपरीत तिचे मंदिर बांधले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सिंधी समाजातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला आणि ‘जल’, ‘ज्योत’, बाबा झुलेलाल आणि बाबा छतुराम यांच्या कार्याची महती कळली.
- श्रीकांत चौगुले, साहित्यिक, नवी सांगवी.
--
फोटो ः 49607, 49608
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.