पिंपरी, ता. २८ ः पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकसित होत असले तरी प्रत्यक्षात मात्र नागरिकांना ‘केबल सिटी’त राहतोय की काय? असा प्रश्न पडू लागला आहे. शहरातील उड्डाणपूल, मुख्य रस्त्यांवरील पथदिवे तसेच महत्त्वाच्या चौकांमध्ये एका खांबावरून दुसऱ्या खांबावर अनधिकृतपणे टाकलेल्या केबलचे जाळे निर्माण झाले आहे. खासगी सेवा पुरवणाऱ्या नामांकित कंपन्यांनी अंदाधुंद पद्धतीने टाकलेल्या या केबलमुळे शहराचे सौंदर्य हरवत चालले आहे. त्याचबरोबर गंभीर अपघाताचा धोका वाढला आहे.
डांगे चौकातील उड्डाणपुलावरून वाऱ्याच्या जोराने वायरी खाली कोसळल्या. त्याचवेळी मुसळधार पावसामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आणि गुरुवार (ता. २१) आणि शुक्रवार (ता. २२) असे दोन दिवस वाहतूक ठप्प झाली. शेकडो वाहनचालक आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागला. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे असे प्रकार घडत असल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत. तसेच, स्मार्ट सिटीचा गवगवा होत असताना शहराच्या रस्त्यांवर वायरींचे धोकादायक जाळे लटकत राहणे हे नियमांची पायमल्लीच आहे. अशा अनधिकृत सेवा वाहिन्यांना आळा घालून केबलचे व्यवस्थापन सुव्यवस्थित कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
केबलच्या जाळ्यात उपनगर
पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, वाकड, रहाटणी, काळेवाडी, थेरगाव, ताथवडे, पुनावळे, रावेत, चिंचवड, आकुर्डी आणि पिंपरी या उपनगरांमध्ये ‘ब्रॉडबॅण्ड’ सेवा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी विद्युत खांबांवरून अनधिकृत केबल टाकल्याचे चित्र दिसून येत आहे. मोठ्या गृहनिर्माण संस्था, वाणिज्य वसाहती, शाळा व रुग्णालयांच्या इमारतींवरून थेट या केबल ओढल्या आहेत. इतकेच नव्हे तर काही ठिकाणी बीआरटी बस थांब्यांचा आधार घेऊन या वायरी रस्त्यांवरून सोसायट्यांमध्ये नेल्या आहेत. परिणामी, भूमिगत पुरवठा असायला हवा तो प्रत्यक्षात खांबावरून लटकणाऱ्या केबलमधून होत असल्याचा भास निर्माण झाला आहे. या अनधिकृत वायरींमुळे परिसराचे सौंदर्य विद्रूप झाले असून, शहराला बकालपणा आला आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा व सौंदर्याचा प्रश्न निर्माण होत असतानाही संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याची टीका होत आहे.
उड्डाणपूल, विद्युत खांबांवर वायरी
नाशिक फाटा येथील भारतरत्न जे. आर. डी. टाटा उड्डाणपुलावर सेवा वाहिन्यांच्या केबल मोठ्या प्रमाणात लटकलेल्या दिसतात. कासारवाडी, सांगवी व दापोडी परिसरातही अनधिकृत केबल टाकण्यात आल्या असून, त्या रस्त्यावर पडून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तरीदेखील प्रशासनाने यावर अद्याप ठोस भूमिका घेतलेली नाही. भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाचाही केबल टाकण्यासाठी आधार घेतला गेला आहे. तसेच, सर्वत्र विद्युत खांबांवरूनही केबल ओढल्या गेल्या आहेत. परिणामी, परिसराचे सौंदर्य हरवून बकालपणा आला आहे. इंद्रायणीनगर, मोशी, चिखली, मोरे वस्ती, त्रिवेणीनगर आणि तळवडे भागांत तर विद्युत खांबांवरून अनधिकृत केबल टाकण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे शहराच्या रस्त्यांचे आणि चौकांचे सौंदर्य विद्रूप झाले असून, केबलच्या जाळ्यांमुळे अपघाताचा कायम धोका निर्माण झाला आहे.
‘‘डांगे चौक उड्डाणपुलावरून दोन दिवस केबल रस्त्यावर लोंबकळत होती. पावसात अपघाताचा धोका निर्माण झालेला असताना या केबल काढण्यासाठी इथे कोणीही आले नाही. याबाबत तक्रार कोणाकडे करायची? हा प्रश्न आहे. केबल कंपन्यांना काहीतरी नियम लावले पाहिजेत.
- तुकाराम पाटील, दुचाकी चालक, थेरगाव
‘‘महापालिका रस्त्याच्या मधोमध विद्युत खांब उभा करते. त्यावरून केबल टाकताना महापालिकेची परवानगी नसताना काही केबल कंपन्यांनी वायरी टाकल्या आहेत. अनेकवेळा या वायरी खाली लोंबकळतात. रस्त्यावर विखुरल्या जातात. यामुळे अनेकदा अपघात झाले आहेत.
- सचिन मोरे, पादचारी, भोसरी
‘‘केबल कंपन्यांना महापालिकेच्या मालमत्तेवरून वायर टाकण्याची परवानगी दिली जात नाही. अनधिकृतपणे केबल टाकणाऱ्या कंपन्यांवर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवाई होणे अपेक्षित आहे.
- राजेश आगळे, उपायुक्त, आकाशचिन्ह व परवाना विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका
‘‘विद्युत खांबांवरून सेवा वाहिन्यांची केबल टाकण्याची परवानगी कदाचित आकाशचिन्ह परवाना विभागाकडून दिली जात असावी. अनधिकृतपणे केबल टाकण्यास खासगी संस्थांना विद्युत विभाग परवानगी देत नाही.
- माणिक चव्हाण, सहशहर अभियंता, विद्युत विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.