पिंपरी, ता. १९ : सध्याच्या काळात कोणतीही खरेदी करायची असेल, तर ‘सोशल मीडिया’वर ट्रेंड पाहिला जातो. घरातील वस्तू, इंटेरिअर, सजावटीचे साहित्य आणि अगदी फॅशनचे रील्सनुसार अनुकरण केले जाते. हाच ‘ट्रेंड’ गेल्या दोन वर्षांपासून मखरांबाबतही दिसून येत आहे.
ऑनलाइन रील्स व व्हिडिओ पाहून त्यानुसार घरगुती मखर बनवण्याकडे सध्या गणेशभक्तांचा ‘ट्रेंड’ आहे. त्यासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. पारंपरिक मखरांनाही मागणी आहे. मात्र, आपले मखर आपल्याला हवे तसे तयार करून घेण्यासाठी आवश्यक साहित्य खरेदीकडे कल दिसून येत आहे.
घरीच मखर बनविण्याची ‘हौस’
लाडक्या बाप्पासाठी मात्र दिनक्रमातून वेळ काढून मखर तयार करण्याकडे गणेशभक्तांचा कल वाढत आहे. विशेषतः तरुणांमध्ये रील्स व व्हिडिओ पाहून घरीच मखर तयार केले जात आहे. यासाठी लागणारे कापड, लाकडी व लोखंडी फ्रेम, बॅकड्रॉप यांची खरेदी वाढली आहे. आपल्या बाप्पासाठी घरीच मखर बनवावे या हौसेखातर घरीच मंदिरे, फुलांचे मखर, फुलांचे झोके, पाळणा यासारख्या कलाकृती साकारल्या जात आहेत. घरगुतीसह सोसायट्यांमध्येही हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात आहे.
कस्टमाइज मखर व कापडी बॅकड्रॉप्सना मागणी
तयार मखराऐवजी आपल्या गणेशमूर्तीचा आकार आणि त्यावरील रंगसंगतीनुसार मखर खरेदी केले जात आहेत. नागरिकांकडून मागणी पाहता अनेक विक्रेते ग्राहकांची गरज ओळखून हवे तसे मखर बनवून देत आहेत. यामध्ये फुलांचे मखर, कापडी मखर, तसेच लाकडी व फोमच्या असंख्य प्रकार उपलब्ध आहेत. कापडी मखरांमध्ये सॅटिन, नेट, पैठणी, खण या कापडाच्या प्रकारांचा वापर केला जात आहे. अनेकजण एमडीएफ बेस असलेले साधे मखर विकत घेतात आणि त्याला हवी तशी सजावट करतात. मात्र, ज्यांना वेळ नसतो असे ग्राहक ऑर्डर देऊन सजावट करून घेतात, असे विक्रेत्यांनी सांगितले. याच्या किमती आठशे ते दोन हजार रुपयांपर्यंत आहेत.
तयार मखरांच्या तुलनेत कितीतरी जास्त प्रमाणात मखराचे साहित्य विकले जात आहे. कापडी मखरांमध्ये प्रकारांमध्ये पैठणीचे बॅकड्रॉप, आसन, लोड यांना मोठी मागणी आहे. या कापडी संचाची किंमत इतर मखरांपेक्षा अधिक आहे. फक्त बॅकड्रॉपची किंमत आठशे रुपयांपासून पुढे आहे. पूर्ण संच हा दोन हजारांपुढे आहे. मात्र, साधे दिसायला आकर्षक व पर्यावरणपूरक असल्याने अनेक गणेशभक्त हे संच खरेदी करत आहेत.
- मोहिनी चव्हाण, मखर विक्रेत्या
PNE25V41178
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.