पिंपरी : दोन हजार रुपये हप्ता न दिल्यास त्रास देण्याची धमकी देत कोयता हवेत फिरवून दहशत माजविणाऱ्या एकाला चिखली पोलिसांनी अटक केली. हा प्रकार चिखली स्पाईन रोड येथे शुक्रवारी रात्री घडला. या प्रकरणी चिखली येथील तीस वर्षीय महिलेने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मयूर प्रवीण पवार (रा. टॉवर लाइन, चिखली) याला अटक केली आहे. फिर्यादी यांची चहा विक्रीची हातगाडी असून आरोपीने कोयत्याने फिर्यादीच्या हातगाडीवरील बॅनर फाडला. शिवीगाळ करून फिर्यादीच्या पतीचा खून करण्याची धमकी दिली. भाई असल्याचे सांगत दोन हजार रुपये हप्ता देण्याची मागणी केली. हप्ता न दिल्यास पुन्हा त्रास देणार, असे म्हणत कोयता हवेत फिरवून दहशत माजवली.
बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
पिंपरी : बेकायदारित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला काळेवाडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई थेरगाव येथील स्मशानभूमीजवळ करण्यात आली. स्वप्निल उर्फ सोप्या सुनील लोंढे (रा. नखाते वस्ती, रहाटणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीकडून पंचवीस हजार रुपये एक पिस्तूल व दोन हजार रुपये किमतीचे एक काडतूस जप्त केले.
अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तडीपार गुंडाला अटक
पिंपरी : पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेले असतानाही अमली पदार्थ विक्रीसाठी शहरात आलेल्या गुंडाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई चिखलीतील मोरेवस्ती येथे करण्यात आली. किरण शिवाजी खवळे (वय २७, रा. मोरे वस्ती, चिंचेचा मळा, चिखली) असे अटक केलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. किरण हा हद्दीत आला असून त्याच्याकडे अमली पदार्थ असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन लाख ४६ हजार २०० किमतीचा एमडी हा अमली पदार्थ व एक मोबाईल जप्त केला.
गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
पिंपरी : विक्रीसाठी गांजा जवळ बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई चऱ्होलीतील तापकीरनगर येथे करण्यात आली. संतोष बाळकृष्ण तापकीर (रा. तापकीरनगर, चऱ्होली) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी साडेआठ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला.
---