पिंपरी, ता. २ ः पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी खासगी शाळेतील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ७५ टक्के सवलतीचे अनुदानित बस प्रवास पासचे वितरण शनिवारपासून (ता. २८) सुरू झाले आहे. पण, विद्यार्थ्यांच्या बस पाससाठी देखील हद्दीचा वाद सुरु झाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील खासगी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पीएमपीएमएलकडून बस पास देण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे पास केंद्रावर गेलेल्या विद्यार्थी आणि पालकांना रिकाम्या हातांनी परतावे लागत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे ६६५ प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत. काही खासगी शाळांनी विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी खासगी बस उपलब्ध करून दिल्या आहेत, तर काही विद्यार्थी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करतात. अशा विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी सवलतीच्या दरात पास उपलब्ध करून दिले जातात. यंदा २८ जूनपासून बस पास वितरणाला सुरवात झाली. पण, आता बस पाससाठी ‘हद्द’ आडवी आली आहे. पालिकेने त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात महापालिका हद्दीत राहणाऱ्या व हद्दीबाहेर शिक्षण घेत आहेत अशाच पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत बस पास सुविधेचा लाभ घेता येईल, असे नमूद केले आहे. पण, महापालिका हद्दीबाहेरील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बस पास देण्यास पीएमपीएमएलने नकार दिला आहे. पीएमपीएमएल आणि पालिका प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे विद्यार्थी आणि पालकांची फरफट होत आहे. पास केंद्रावर विद्यार्थी आणि पालकांना हेलपाटे मारावे लागत आहेत.
-------
अंतर्गत विभागातच समन्वयाचा अभाव
‘पीएमपीएमएल’ने २८ जून रोजी परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना बस पास वितरण सुरु झाल्याची माहिती प्रसिद्ध केली. यात पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीतील व हद्दीबाहेरील विद्यार्थ्यांनाही पास देण्यात येणार असल्याचे प्रसिद्ध केले होते. पण, प्रत्यक्षात हद्दीबाहेरील विद्यार्थ्यांना पास दिले जात नाहीत. त्यामुळे पीएमपीएमएलमधील अंतर्गत विभागातच समन्वय नसल्याचे समोर आले आहे.
-----------
पालिकेचे शिक्षण विभागच अनभिज्ञ
महापालिकेच्या प्राथमिक विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांना विद्यार्थी पासबाबत विचारले असता, माहिती घेऊन सांगते अशी प्रतिक्रिया दिली. पण, त्यानंतर फोन करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पालिकेतील अधिकारीच विद्यार्थी पास योजनेबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून येते.
----------
‘‘माझा मुलगा केंद्रीय विद्यालय गणेशखिंड औंध, पुणे येथे शिकतो. त्याला रोज महापालिका बसने प्रवास करावा लागतो. गेल्या वर्षी पण आम्हाला २५ टक्के सवलतीचा पास हद्दीचा मुद्दा पुढे करून दिला नाही. यंदाही पास देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आमचे खूप आर्थिक नुकसान होत आहे.
-लता चव्हाण, पालक, रावेत
-------
‘‘आम्ही रोज आमच्या मुलाला दिवसाचा पास काढून औंध येथील डीएव्ही शाळेत पाठवतो. २५ टक्के सवलतीचा पास असल्यास आम्हाला आर्थिक भूर्दंड पडत नाही. पालिकेने हद्दीचा मुद्दा दूर करून सरसकट पास द्यावे.
भाऊसाहेब भोई, पालक, भोंडवे वस्ती, रावेत
--------
‘‘विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास देत आहोत. पण, जर हद्दीच्या बाहेर शाळा आहे म्हणून विद्यार्थ्यांना पास मिळत नसतील तर हे दुर्दैवी आहे. पास विभागाला हद्द न पाहता सर्वच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास देण्याचे आदेश देणार आहे.
- दीपा मुधोळ-मुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.