पिंपरी-चिंचवड

हिंजवडीसह सात गावे पिंपरी चिंचवड महापालिकेत

CD

पिंपरी, ता. ७ : ‘‘हिंजवडीसह माण, मारुंजी, जांबे, नेरे, सांगवडे, गहुंजे ही गावे पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्याबाबत तत्काळ कार्यवाही करावी,’’ असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना सोमवारी (ता.७) दिले.
दरम्यान, या गावांतील समस्यांबाबतचे निवेदन खासदार श्रीरंग बारणे यांनी शिंदे यांना; तर चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे यांना दिले. त्यावर हे आदेश देण्यात आले. दरम्यान, हिंजवडीतील समस्यांना वाचा फोडत ‘सकाळ’ने येथील नागरिकांच्या अडचणी सातत्याने मांडल्या. तसेच; ‘‘हिंजवडीसह सात गावे महापालिकेत समावेश होण्याच्या हालचाली’’ हे वृतही सर्वप्रथम ‘सकाळ’नेच दिले होते. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाने या वृत्तांवर शिक्कामोर्तब झाले आहे.

‘‘हिंजवडी आयटी पार्क परिसरातील पायाभूत सुविधांचा उडालेला बोजवारा, पावसाळ्यात साचणारे पाणी आणि त्यामुळे आयटीयन्सची कोंडी, वीज प्रश्‍न, रस्त्यांची चाळण हे विषय गंभीर झाले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीलगत असलेली ही सात गावे महापालिकेत घ्यावीत. त्यामुळे या गावांचा नियोजनबद्ध विकास होईल’’, असे साकडे या निवेदनांद्वारे घालण्यात आले. दरम्यान, हिंजवडीतील प्रश्‍नांबाबत बारणे आणि जगताप यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्थानिक नागरिक, आयटीएन्स यांच्यासोबत सोमवारी (ता. ७) भेट घेतली. यावेळी सविस्तर चर्चाही झाली.

‘‘हिंजवडीसह परिसरातील गावांमध्ये अनधिकृत बांधकामे वाढली आहेत. नैसर्गिक नाले बुजविले जात असून वळविले जात आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात हिंजवडी जलमय झाली. नदीलाही गटारीचे स्वरूप आले आहे. या गावांची जबाबदारी ‘पीएमआरडीए’कडे आहे. त्यांच्याकडे मनुष्यबळ कमी आहे. अनधिकृत बांधकामांवर ते नियंत्रण ठेऊ शकत नाहीत. त्यामुळे परिसराला बकालपणा येत आहे. वाहतूक कोंडी, विविध समस्यांमुळे या भागातील नागरिक त्रस्त आहेत. गावांचा विकास, नागरिकांना सर्व सोयी-सुविधा मिळाव्यात आणि अनाधिकृत बांधकाम रोखण्याच्या दृष्टीने या भागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी द्यावा,’’असे खासदार बारणे व जगताप यांनी निवेदनात म्हटले आहे.

महापालिका हद्दीलगतच्या या सात गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. तेथे पायाभूत सुविधांचा अभाव आहे. हिंजवडीचा विकास होणे गरजेचे आहे. वाढत्या लोकसंख्येला सुविधा देणे ग्रामपंचायतींना शक्य होत नाही. त्यामुळे गावांचा महापालिकेत समावेश करण्याची मागणी नागरिकांनी केली.
- श्रीरंग बारणे, खासदार, मावळ

या भागांचा विकास ग्रामपंचायतींच्या क्षमतेबाहेर गेला आहे. नागरिकांना सुविधा देण्यासाठी आणि नियोजनबद्ध नागरीकरणासाठी या गावांचा तातडीने पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश होणे अत्यावश्यक आहे.
- शंकर जगताप, आमदार, चिंचवड

हिंजवडी आयटी पार्कची समस्यांतून मुक्तता व्हावी, यासाठी संबंधित सर्व शासकीय विभाग आणि लोकप्रतिनिधी यांची स्वतंत्र बैठक मुख्यमंत्र्यांनी आयोजित केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात समाविष्ट भागाचा विकास गतिमान होईल.
- महेश लांडगे, आमदार, भोसरी

ही गावे होणार समाविष्ट
हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे (ता. मुळशी), सांगवडे व गहुंजे (ता. मावळ)

महापालिकेने २०१८ मध्येच पाठवला प्रस्ताव
या सात गावांच्या समावेशासाठी २०१८ मध्येच पिंपरी-चिंचवड महापालिकेने ठराव करून शासनाकडे सुधारित प्रस्ताव पाठवला आहे. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

मागणीमागील प्रमुख कारणे:
- राजीव गांधी आयटी पार्कमुळे या परिसरात माहिती तंत्रज्ञान व औद्योगिक प्रकल्प मोठ्या प्रमाणात उभारले गेले आहेत.
- मोठ्या प्रमाणावर आयटीयन्स व अन्य राज्य, परदेशांतील नागरिक येथे स्थायिक झाले आहेत.
- या सात गावांची एकत्रित तरल लोकसंख्या अंदाजे दोन लाखांवर पोहोचली
- रस्ते, पाणी, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सेवा, वाहतूक यंत्रणा यावर ताण वाढला
- शासकीय यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने विकासकामे रखडली

समावेशामुळे णारे फायदे...
- एकसंध नागरी प्रशासनाखाली नियोजनबद्ध व शाश्वत विकास
- समन्वित व जलद निर्णयक्षम व्यवस्था
- वाहतूक समस्यांवर ठोस उपाय
- आवश्यक नागरी सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध
- शासनाच्या महसुलात वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याचा भावात चार दिवसांनंतर बदल, जाणून घ्या आज महाग झाले की स्वस्त?

Latest Maharashtra News Updates : : शारीरिक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत उकळले तीन कोटी

Guru Purnima 2025: गुरूपौर्णिमा का साजरी केली जाते? वाचा त्यामागील 'ही' पौराणिक कथा

Pune-Ahmednagar Railway : अहिल्यानगर महामार्गालगत नवा रेल्वे मार्ग; नव्या मार्गासाठी ११ हजार कोटी रुपये खर्च येण्याचा अंदाज

Kolhapur Crime News : मारहाणीचा बदला म्हणून केला खून, संशयित पळून जाण्याचा करत होते प्रयत्न; पण...

SCROLL FOR NEXT