सुंदर निसर्ग अनुभवायचाय; आंदर मावळात या..
सह्याद्रीच्या रांगा, छोटे-मोठे धबधबे, हिरवीगार शिवारे अन् ठोकळवाडी जलाशय
दक्ष काटकर ः सकाळ वृत्तसेवा
टाकवे बुद्रुक, ता. १ : एकदा आपण मावळातील टाकवे बुद्रुक गाव ओलांडले की, आपण पोहचतो आंदर मावळ भागात. सह्याद्रीची न संपणारी विस्तीर्ण रांग, जागोजागी कोसळणारे छोटे-मोठे धबधबे, बाजूलाच गावे, हिरवीगार शिवारे, शेतीमधून नागमोडी वळणाचा रस्ता अन् ठोकळवाडी जलाशयाचे पाणीच पाणी...हे ऐकूनच भारी वाटले ना? हो, हे दृश्य सध्या या आंदर मावळ भागात पाहायला मिळत असून, हा नजारा शहरवासीयांना ग्रामीण जीवन अनुभवण्यासाठी परिपूर्ण ठरणारे आहे.
आंदर मावळ भागातील टाकवे बुद्रुक-वडेश्वर-सावळा-भोयरे-टाकवे बुद्रुक हा आंदर मावळातील परिसर ठोकळवाडी धरणाच्या वेढ्यावर असून, या वेढ्यासाठी जवळ-जवळ ६० किलोमीटरच्या अंतराचा प्रवास करावा लागतो. सद्यःस्थितीत हिरव्यागार झाडा-झुडपांनी नटलेली पर्वतरांग, भात लागवडीमुळे झालेली हिरवीगार भातशेती. काही ठिकाणी शेतीकामात मग्न असलेले शेतकरी, धुक्याने वेढलेला हा भाग निसर्गाचा आनंद देण्यासाठी तयार असून, पर्यटकांनी व निसर्गप्रेमींनी या आंदर मावळचा सुंदर भाग पाहण्याचा आनंद नक्कीच घ्यायला हवा.
काय पाहाल
मोरमारेवाडी धबधबा, गभालेवाडी धबधबा, वडेश्वर येथील धबधबे, घाटेवाडी येथील प्राचीन घाटेश्वर मंदिर, ठोकळवाडी धरण, कुसवली धबधबा, बोरवली येथील अंजनीमाता मंदिर, कांब्रे लेणी, बेंदेवाडी धबधबा, कुसूर येथील विहंगम दृश्य, खांडी १८ नंबर वीजनिर्मित प्रकल्प, पिंपरी येथील वरसुबाई मंदिर, माळेगाव खुर्द येथील खडकेश्वर मंदिर, अनसुटे-पारीठेवाडी येथील धबधबे, कोंडिवडे येथील आंद्रा नदीवरचा पूल, कल्हाट येथील तासूबाई मंदिर, निगडे येथील पद्मावती लेणी.
कसे जाल
- पुणे - देहूरोड - जांभूळ फाटा - टाकवे बुद्रुक - आंदर मावळ
- मुंबई - लोणावळा - कान्हे फाटा - टाकवे बुद्रुक - आंदर मावळ
खाण्याची सोय कुठे आहे
- कान्हे फाटा, टाकवे बुद्रूक या ठिकाणी हॉटेल व ढाबे
- आंदर मावळमध्ये अनेक ठिकाणी चहा व नाश्त्याची सोय
- काही ठिकाणी घरगुती पद्धतीच्या जेवणाची सोय उपलब्ध
- वडेश्वर-डाहुली-कोंडिवडे याठिकाणी राहण्याची व खाण्याची सोय
- भोयरे याठिकाणी याठिकाणी चहा, नाश्त्याची सोय उपलब्ध
महत्त्वाचे
- डाहुलीच्या पुढे मोबाईल नेटवर्कची समस्या
- टाकवे बुद्रुक याठिकाणी पेट्रोलपंप, पुढे इंधनाची सोय नाही
- आवश्यक वस्तू सोबत असू द्याव्यात
- प्रथोमपचार कीट सोबत असू द्या
- धोकादायक ठिकाणी जाण्याचा मोह टाळा
- टाकवे-वडेश्वर-भोयरे याठिकाणी टायर पंक्चरची दुकाने
काय काळजी घ्याल
- रस्त्याची कामे चालू असल्याने वाहने सावकाश चालवा
- नागमोडी वळणाचे व तीव्र चढउताराचे रस्ते
- वाहने काळजीपूर्वक चालवा, वळणावर हॉर्न वाजवा
- रस्ते अरुंद असल्याने समोरून येणाऱ्या वाहनाला जागा द्या
- पाण्याच्या प्रवाहाच्या ठिकाणी तसेच ठोकळवाडी धरणात उतरण्यास टाळा
बचावकार्यासाठी हेल्पलाइन नंबर
- वडगाव पोलिस स्टेशन ०२११४-२३५३३३
- जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष टोल फ्री क्र. १०७७
- शिवदुर्ग मित्र लोणावळा ९८२२५००८८४
- वन्यजीवरक्षक संस्था मावळ ९८२२५५५००४
- आपत्ती व्यवस्थापन मावळ ९९६०९९६०९५
- ॲम्बुलन्स १०८, १०२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.