हिंजवडी, ता. २६ : उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री अजित पवार यांनी राजीव गांधी आयटी पार्क, हिंजवडी-माणमधील विकासकामांची शनिवारी (ता. २६) सकाळी सहा वाजता पाहणी केली. कामांचा आढावा घेताना त्यांनी अधिकारी, पुढारी, सरपंच, बांधकाम व्यावसायिकांसह ग्रामस्थांनाही खडे बोल सुनावले. विकास कामात अडथळे आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश त्यांनी दिला.
काही लोकांमुळे ही वेळ आली असून आयटी कंपन्यांचे स्थलांतर होत असल्याचा मुद्दा त्यांनी गांभीर्याने घेतला. त्यांनी सलग दुसऱ्यांदा सकाळी सहा वाजल्यापासून प्रत्यक्ष पाहणी केली. वाहतूक कोंडी, जलकोंडी, अतिक्रमणे आदि समस्यांसह पुणे-हिंजवडी मेट्रो लाईन तीनच्या कामाचा आढावा त्यांनी घेतला. हिंजवडी आयटी पार्क हे जागतिक दर्जाचे माहिती तंत्रज्ञान (आयटी) केंद्र म्हणून ओळखले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून येथे विविध समस्यांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे आयटी कंपन्यांचे स्थलांतर होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, आमदार शंकर मांडेकर, नंदकुमार भोईर, सागर साखरे, सुनील भरणे यांच्यासह एमआयडीसीचे अधिकारी, आयटी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---
अजित पवार यांचे आदेश
- अधिकाऱ्यांनी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात
- रस्त्याच्या कामाला विरोध करणाऱ्यांवर थेट सरकारी कामात अडथळा आणण्याचा ३५३ कलमाचा गुन्हा दाखल करा
- वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ‘पीएमआरडीए’ने सहा पदरी रस्त्याचा बांधकाम आराखडा तयार करावा
- रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी कठोर कारवाई करा
- दोन मोठे प्रकल्प आणि एका कंपनीने मिळून मोठा नाला बुजविल्याने त्या अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करा
- नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह मोकळे करा
- पुणे-हिंजवडी मेट्रो प्रशासनाने प्रलंबित कामे दर्जेदार तसेच गतीने पूर्ण करावीत
- मेट्रो स्थानकांच्या जिन्यांसाठी पर्यायी व्यवस्था करा, रस्त्याच्या बाजूला बदल करा
---
‘आयटी पार्क चालले, तुम्हाला काहीच नाही’
हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांनी गावठाणातील जुनी घरे, मंदिरे व ग्रामपंचायतीची इमारत बाधित होत असल्याने रस्ता लहान करण्याची विनंती केली. यावर पवार संतापले. ‘धरण बांधताना मंदिरे पाण्यात जातातच की नाही,’ असा सवाल करीत ते गरजले, ‘‘हिंजवडीचे आयटी पार्क बंगळूर, हैदराबादला चाललेय. त्याचे तुम्हाला काहीच पडलेले नाही.’’ ‘मी पाहणीसाठी पहाटे सहा वाजता इथे का येतो,’ असा सवाल करीत त्यांनी स्थानिक प्रशासन आणि नागरिकांना जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले.
---
‘तुमच्या सारख्यांमुळेच महाराष्ट्र बदनाम’
फेज तीनमधील डोहलर कंपनीसमोरील ओढ्यावर एका बांधकाम व्यावसायिकाने बांधलेली इमारत पाडण्याचे आदेश देण्यात आले होते. संबंधित व्यावसायिक पवार यांना नकाशा दाखवत होता. त्यावेळी पवार संतापून म्हणाले, ‘‘याला घ्यारे आत. तुम्ही कमवा पैसे, आम्ही खातो शिव्या...तुमच्यासारख्या लोकांमुळेच महाराष्ट्र बदनाम होतोय.’’
---
अधिकारीही सुटले नाहीत
पवार यांच्या तडाख्यातून अधिकारीही सुटले नाहीत. ‘एसी’त बसणे सोडून जरा ‘फिल्ड’वर काम करा, असे त्यांनी सुनावले.
-----
फोटो
09125
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.