पुणे : कोरोनाबाधीत रुग्णांसाठी आवश्यक रेमडेसिव्हीर या इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनीट चारच्या पथकाने 5 जणांना अटक केली. त्यांच्याकडून इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला असून ही कारवाई चंदननगर व लोणीकंद परिसरात करण्यात आली. इम्तीयाज युसूफ अजमेरी (वय 52, रा. खराडी, चंदननगर), परवेज मैनोद्दीन शेख (वय 36, रा. तुकाईनगर), अश्विन विजय सोळंकी (वय 41, रा. येरवडा), रोहिदास बालाजी गोरे (वय 47, रा. गोरे वस्ती, नगर रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सात रेमडेसिव्हीर इंजेक्शन जप्त केले. याप्रकरणी अन्न व औषध निरीक्षक दिनेश मानकचंद खिंवसरा व श्रृतिका कमलसिंग जाधव यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चंदनगर व लोणीकंद पोलिस ठाण्यात फसवणूक, जीवनाश्यक वस्तू अधिनियमाचे कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरामध्ये कोरोना रुग्णांना रेमेडेसिव्हीर या इंजेक्शनची सध्या गरज भासत आहे. असे असताना शहरामध्ये काहीजण बेकायदेशीरपणे संबंधित इंजेक्शनची बाहेर विक्री करतीत असल्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले होते. या कारवाईसाठी त्यांनी गुन्हे शाखेच्या विशेष पथकाचीही स्थापना केली आहे. गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी वाघोरी परिसरात बुधवारी रात्री गस्त घालत होते. त्यावेळी वाघोली परीसरात एक व्यक्ती रेमडेसिव्हीर हे इंजेक्शन दहा हजार रुपयांना विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकास समवेत घेऊन तेथे बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर गोरेला अटक केली. दरम्यान, चंदननगर येथील डिमेलो पेट्रोलपंपाजवळ एक व्यक्ती रेमडेसिव्हीर इंजेक्शन 18 हजाराला विक्री करत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार, तेथेही बनावट ग्राहक पाठवून खात्री केल्यानंतर सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत दोन इंजेक्शन मिळून आले. आरोपींकडे मिळून आलेली इंजेक्शन त्यांनी दौंड येथून आणल्याची माहिती प्राथमिक चौकशीत पुढे आली. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनीट युनिट- 4 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल यांच्या पथकाने केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.