पुणे

अबब! पुण्याचे तापमान 43 सेल्सिअस! सव्वाशे वर्षांनंतर विक्रमी नोंद

सकाळवृत्तसेवा

पुणे : शहराच्या कमाल तापमानाने रविवारी नवा विक्रम नोंदविला. 122 वर्षांपूर्वी शहरातील तापमान 43.3 अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. त्यानंतर रविवारी कमाल तापमानाचा पारा 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोचला. यामुळे एरवी सुटीच्या दिवशी घराबाहेर पडणाऱ्या पुणेकरांनी घरीच थांबणे पसंत केल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता. 

शहरात गेल्या सहा दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. मागील मंगळवारपासून (ता. 23) कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदविले जात आहे. गेल्या आठ दिवसांत कमाल तापमानात 4.4 अंश सेल्सिअसची वाढ झाल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले आहे. त्यामुळे जागतिक तापमानवाढीची समस्या आता केवळ पृथ्वीच्या ध्रुवावरील बर्फ वितळण्यापुरती किंवा समुद्राची पाणीपातळी वाढण्यापुरती मर्यादित राहिली नसून, ती शहरापर्यंत पोचल्याचे हवामानतज्ज्ञांनी स्पष्ट केले. 

रविवारी सुटीच्या दिवशी सकाळी नऊ वाजताच उन्हाचा चटका जाणवू लागला. दुपारी साडेबारापर्यंत कमाल तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडली. उन्हाचा चटका इतका भयंकर होता, की दुपारपासून ते संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत घराच्या बाहेर पाऊल टाकणे अशक्‍य वाटत होते. घरातही उन्हाच्या झळा जाणवत होत्या. दारे, खिडक्‍या, पडदे लावून घरात पंखा लावल्यानंतरदेखील बाहेरील उन्हाची तीव्रता समजत होती. त्यामुळे नागरिक उन्हामुळे पुरते हैराण झाले होते. सकाळी शहरातील प्रमुख रस्त्यांवर तुरळक गर्दी दिसत होती. मात्र, दुपारनंतर या रस्त्यांवर शुकशुकाट होता. 

पुण्यात आतापर्यंत 30 एप्रिल 1897 साली 43.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून 
कमाल तापमान या वर्षी 43 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदले जाईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार रविवारी दुपारी अडीच वाजता कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस नोंदले गेले. सरासरीपेक्षा 5.1 अंश सेल्सिअसने हे तापमान वाढले होते. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमान 4.2 अंश सेल्सिअसने वाढून ते 25.4 अंश सेल्सिअस नोंदले गेले. 

हवामान अंदाज 
पुढील चोवीस तासांत शहर परिसरात उष्णतेची लाट कायम राहील. तसेच, आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्‍यता असल्याने कमाल तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

पुण्याचे तापमान 43 अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल, असा अंदाज गेल्या दोन दिवसांपासून होता. पुढील एक किंवा दोन दिवस उन्हाचा चटका असाच कायम राहील. त्यानंतर अंशतः तापमान कमी होईल. पुण्यातील या कमाल तापमानाच्या मागे जागतिक तापमान हे कारण आहे. 
- डॉ. ए. के. श्रीवास्तव, हवामानशास्त्रज्ञ, भारतीय हवामान विभाग. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT