Dilipkumar
Dilipkumar Sakal
पुणे

पुण्यात फळविक्री ते ‘जीवनगौरव’ पुरस्कार...

सकाळ वृत्तसेवा

पुणे - आपल्या उत्तुंग अभिनयानं संपूर्ण देशातल्या चाहत्यांवर अधिराज्य करणारे दिलीपकुमार (Dilipkumar) यांनी एके काळी पुण्यात चक्क फळं विकली (Fruit Selling) होती. होय! इसवीसन १९४३ च्या सुमारास यांनी पुण्यात (Pune) हे काम केलं होतं आणि विशेष म्हणजे याच फळविक्रीशी संबंधित एका कामामुळे त्यांच्या कारकिर्दीला एक वेगळं वळण मिळालं. (Dilipkumar Fruit Seller to Jeevangaurav Award Journey)

दिलीपकुमार यांचे वडील सरवर खान हे फळविक्रीच्या व्यवसाय करायचे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांना व्यवसायात मोठं नुकसान सहन करावं लागलं. त्यामुळे त्यांना मदत म्हणून दिलीपकुमार ऊर्फ युसूफ पुण्यात आला होता. पुण्यात कॅंप भागात ब्रिटिश सैन्याच्या एका तुकडीच्या बराकींमध्ये मेस चालवणारा सरवर खान यांच्या मित्राच्या ओळखीचा होता. त्याच्या मार्फत युसूफनं कंत्राटदाराचा सहायक म्हणून नोकरी मिळवली. पुण्यातलं कँटीन सांभाळतासांभाळता युसूफनं ताजी फळंदेखील विकायला सुरवात करून उद्योजकता दाखवली आणि उत्पन्नात घसघशी वाढही केली. मात्र, लवकरच रेशनिंग सुरू झाल्यावर युसूफच्या या व्यवसायाला कुलूप लागलं, असं बनी रूबेन यांनी लिहिलेल्या दिलीपकुमार यांच्या चरित्रात म्हटलं आहे.

पुण्यातल्या फळविक्रीतून युसूफनं वडिलांचा विश्वास मिळवला. एकदा एक सौदा ठरवण्यासाठी त्यांनी युसूफला नैनितालला पाठवलं. तिथं उमद्या युसूफची भेट देविकाराणी यांच्याशी झाली. तिथं देविकाराणी यांनी त्यांना चक्क चित्रपटात काम करण्याविषयी विचारणा केली. नंतर सहज म्हणून ते देविकाराणींना भेटायला गेले आणि तिथं थेट ‘ज्वारभाटा’ हा चित्रपट मिळाला. याच पुण्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिलीपकुमार यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाला आणि वर्तुळ पूर्ण झालं!

‘अरे भाई, प्याज की भजीयां लेके आना...’

दिलीपकुमार चित्रपटसृष्टीतून संन्यास घेतल्यानंतरही अनेक कार्यक्रमांना सपत्नीक हजेरी लावत असत. पत्रकारांबरोबर गप्पांचा फड रंगवायलाही त्यांना आवडत असे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (पिफ) निमित्तानं २००१मध्ये ते पुण्यात आलेले असताना त्यांनी कॅम्पमधील एका हॉटेलमध्ये पत्रकारांबरोबर अशाच मनसोक्त गप्पा मारल्या होत्या. पुण्यात असताना मी सायकलवर कसा फिरत असे, कॅम्पमधील एका कॅन्टिनमध्ये काम करताना काय अनुभव आले, फळांचा व्यवसाय कसा यशस्वी करून दाखवला, याबद्दल ते अगदी भरभरून सांगत होते.

त्यातच एक प्रसंग सांगत असताना रेल्वेची जोरदार शिट्टी वाजली, त्यावर ‘देखिए मै सच बोल रहा हूं,’ असं म्हणत त्यांनी जवळ बसलेल्या पत्रकारांना टाळीही दिली. बोलत असतानाच अचानक त्यांना त्याकाळी खाल्लेल्या कांदा भजींची आठवण झाली. समोरच उभ्या असलेल्या हॉटेलच्या मॅनेजरला बोलावत म्हणाले, ‘अरे भाई, जरा वो पूनाकी फेमस प्याजवाली भजीयां तो खिलाओ, मजा आ जायेगा...’ भजी मिळाली आणि दिलीपसाहेबांची कळी आणखी खुलली. फेस्टिव्हलमधील चित्रपट, आपल्या काळातील अभिनेत्यांची वैशिष्ट्ये, नव्या दमाच्या अभिनेत्यांमधील त्यांना आवडणाऱ्या, न आवडणाऱ्या गोष्टीही त्यांनी सांगितल्या. पत्रकारांनी सायराबानो यांनाही बोलण्याची विनंती केली, तेव्हा दिलीपसाहेब म्हणाले, ‘‘हमारा यह तय हुआ है...घरमें ये बोलेंगी और बाहर मैं बात करुंगा...’

केळीचे पान अन् उकडीचे मोदक

ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांना पुण्यभूषण पुरस्कार द्यायचे निश्चित केल्यावर त्यांना विचारले. ‘तुम्हाला कोणाच्या हस्ते पुरस्कार स्वीकारायला आवडेल?’ त्यावर त्यांनी ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार आणि नाटककार विजय तेंडुलकर यांची नावे सुचविली. दिलीपकुमार यांनी समारंभास येण्यास होकार दर्शविला. आता त्यांना कार्यक्रमाची पत्रिका प्रत्यक्ष कशी द्यायची ही अडचण असताना ते पुण्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आल्याचे समजले.

त्यांना भेटण्यासाठी तातडीने ते मुक्कामास असलेल्या हॉटेलवर गेलो. पोर्चमध्ये आलो, तर ते मोटारमध्ये बसत असल्याचे दिसले. धावत मोटारजवळ जाऊन भेटण्याचा प्रयत्न करताच सायराबानू माझ्यावर चिडल्या. मी तशा परिस्थितीत दिलीपकुमार यांना जब्बार पटेल यांचा निरोप सांगत होतो. त्यावर दिलीपकुमार यांनी डोळा मारून सांगितले, ‘अरे, सायरा कह रही तो मैं नही आउंगा..’ परंतु डोळा मारला याचा अर्थ ते येणार असा होता. पुरस्कार वितरण कार्यक्रमास दिलीपकुमार ठरल्याप्रमाणे आले. मी त्यांना भेटायला गेलो आणि सहज विचारले, ‘शाम को खाना खाने बाहर जाए.’ क्षणाचाही विलंब न करता ते ‘हा’ म्हणाले. आता माझी पंचायत झाली त्यांना कोठे घेऊन जायचे. त्यावेळी सचिन नाईक यांनी टिळक रस्त्यावर साहिल हॉटेल सुरू केले होते. त्यांना फोन केला आणि एक खास पाहुणा घेऊन येत आहे, केळीच्या पानावर जेवण वाढायचे आणि उकडीचे मोदक कर असे सांगितले. त्यांनी अर्ध्या तासात या व्यवस्था करतो असे सांगितले. दरम्यान मी जब्बार पटेल, सतीश आळेकर, डॉ. मोहन आगाशे यांना फोन करून हॉटेलवर यायला सांगितले. आम्ही हॉटेलवर पोचलो. मोटारमधून माझ्यासह दिलीपकुमार उतरत असल्याचे पाहून सचिन आणि नितीन नाईक आश्चर्यचकित झाले. त्यांनी पहिल्या मजल्यावर चांगली व्यवस्था केली होती. दिलीपकुमार यांनी भोजनाचा आनंद घेतला आणि अभिप्रायही दिला.

- डॉ. सतीश देसाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: निळवंडे कालव्याचं काम मोदींमुळे पूर्ण झालं - देवेंद्र फडणवीस

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्र अजूनही सगळ्यात मागे

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

Kushal Badrike : "... ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर निघून जातात"; कुशलने व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT