पुणे

पुणे  शहर, जिल्ह्यात वळवाची दमदार हजेरी

सकाळ वृत्तसेवा

पुणे - दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांवर रविवारी संध्याकाळी पूर्वमोसमी पावसाच्या (वळीव) जोरदार सरी बरसल्या. वादळी वारा, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात तासभर कोसळलेल्या पहिल्या पावसात चिंब-चिंब भिजण्याचा मनमुराद आनंद पुणेकरांनी घेतला. रात्री साडेआठ वाजेपर्यंत ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सोमवारीदेखील (ता. १०) दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी पडतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 

पुण्यात सकाळपासूनच उकाडा होता. पंख्याशिवाय सुटीच्या दिवशी दुपारी घरात बसणे नकोसे होत होते. त्यातच विजेचा लपंडाव सुरू होता. बाहेर उन्हाचा चटकाही जाणवत होता. दुपारी चार वाजल्यानंतर शहरातील वातावरण बदलू लागले. आकाशात ढग आल्याने उन्हाचा चटका कमी झाला. पण, अर्ध्या-पाऊण तासामध्ये संपूर्ण आकाश काळ्याकुट्ट ढगांनी व्यापले. संध्याकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान ढगांचा गडगडाट सुरू झाला. सोसाट्याचा वारा वाहू लागला. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील गर्दी झपाट्याने कमी होऊ लागली. याच दरम्यान पावसाचे मोठे थेंब पडायला सुरवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची त्रेधा उडाली, तर मुलांनी पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद घेतला. उपनगरांतही हेच चित्र होते. पावसात भिजण्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

वाहतूक कोंडी
कोथरूड, सिंहगड रस्ता, गणेशखिंड, सातारा रस्ता, नगर रस्ता या उपनगरांना जोडणाऱ्या रस्त्यांवर पावसामुळे वाहतूक कोंडी झाल्याचेही दृश्‍य संध्याकाळी दिसत होते. जागोजागी साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस उशिरापर्यंत प्रयत्न करीत होते.

फांद्या कोसळल्या
संध्याकाळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शहरातील वेगवेगळ्या पंधरा ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याची माहिती अग्निशमन विभागातर्फे देण्यात आली. आपटे रस्ता, कोथरूड, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, पाषाण, हडपसर, मंगळवार पेठ, रविवार पेठ, कोरेगाव पार्क, येरवडा या भागांमध्ये फांद्या पडल्याच्या तक्रारी अग्निशमनकडे आल्या होत्या.

विजेचा लपंडाव
शहरात संध्याकाळी वादळी वारे वाहू लागले. त्यामुळे शहराच्या मध्य वस्तीसह उपनगरांमध्ये वीजपुरवठा काही वेळ खंडित झाला होता. शहराच्या मध्य वस्तीतील पेठांमध्ये विजेचा लपंडाव सुरू होता. तर, सिंहगड रस्त्यावर रात्री बराच वेळ वीजपुरवठा खंडित झाला होता.

द्रुतगतीवर वाहतूक विस्कळित
सोमाटणेः वादळी पावसामुळे वीजवाहक तार तुटून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अर्धा तास वाहतूक विस्कळित झाली. परंदवडी नजीक वीजवाहक तार तुटून रस्त्यावर पडली होती. हे एका वाहनचालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने मोटार बाजूला घेऊन थांबवली. या घटनेमुळे सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प होती. 

सासवड-जेजुरी मार्गावर कोंडी
सासवड : येथे सासवड शहरासह परिसरात व विशेषतः पुरंदरच्या पश्‍चिम भागात आज हंगामातील पहिला पाऊस झाला. दुपारी ४ वाजल्यानंतर वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. पावसामुळे काही काळ वीजपुरवठा खंडित झाला; तसेच सासवड-जेजुरी मार्गावर वाहतूक कोंडी झाली.

चाकण परिसरात जोराचा पाऊस
चाकण : चाकण व परिसरात सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान वळवाचा जोराचा पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह तसेच मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने काही ओढ्यांना पाणी वाढले, तसेच शेतात ही पाणी साचले. 

वीस दुचाकीस्वार घसरले 
दौंड : दौंड शहरात रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे रविवारी वीस दुचाकीस्वार घसरून पडले.

कमाल तापमान ३७.७
शहरात संध्याकाळी पावसाच्या सरी पडल्यानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला. तरीही, संध्याकाळपर्यंत कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ४ अंश सेल्सिअसने वाढून ३७.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पुढील दोन दिवस कमाल तापमानाचा पारा ३८ अंश सेल्सिअसपर्यंत असेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.

पुढील तीन दिवसांचा हवामान अंदाज
 सोमवार - दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्‍यता
 मंगळवार - आकाश अंशतः ढगाळ राहील
 बुधवार - विजेच्या कडकडाटासह हलक्‍या पावसाची शक्‍यता 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT