Illegal Cables sakal
पुणे

Illegal Cables : केबलने व्यापले आकाश! उंच इमारती, झाडे, उड्डाण पुलांवर पसरले जाळे

पुणे शहरातील खासगी, सरकारी इमारती, मोठमोठे वृक्ष, पथदिवे, मोबाइल टॉवर्स, होर्डिंग असो किंवा उड्डाणपूल अशा वेगवेगळ्या ठिकाणी अनधिकृतपणे केबल्स लटकलेल्या अवस्थेत दिसत आहेत.

पांडुरंग सरोदे@spandurangSakal

पुणे - शहरातील खासगी, सरकारी इमारती, मोठमोठे वृक्ष, पथदिवे, मोबाइल टॉवर्स, होर्डिंग असो किंवा उड्डाणपूल अशा वेगवेगळ्या ठिकाणी अनधिकृतपणे केबल्स लटकलेल्या अवस्थेत दिसत आहेत. स्थानिक टीव्ही केबल, इंटरनेट व्यावसायिकांपासून अनेक नामवंत कंपन्यांच्या केबल्सचा प्रवास सध्या हवेतून सुरू आहे. हजारो किलोमीटर लांबीच्या केबलच्या या जाळ्यातून नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे.

विशेषतः संबंधित कंपन्यांकडून हवेतून केबल नेऊन महापालिकेचा महसूल बुडविला जात असल्याचे उघडपणे दिसत असूनही महापालिका केवळ बघ्याच्या भूमिकेत असल्याची सद्यःस्थिती आहे.

टीव्ही केबल किंवा इंटरनेट सेवेसाठी स्थानिक केबल ऑपरेटरकडून इमारतीच्या छतावरून जाड केबल घरापर्यंत व्यवस्थित आणल्या जातात. मात्र त्यापूर्वी या केबलचा होणारा प्रवास इतरांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार असतो.

या भागांत सर्वाधिक जाळे

शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठा, गणेशखिंड रस्ता, कर्वे रस्ता, जंगली महाराज रस्ता, सेनापती बापट रस्ता, जुना मुंबई-पुणे महामार्ग, नगर रस्ता, सोलापूर रस्ता, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता या प्रमुख व अंतर्गत रस्त्यांवरील पथदिव्यांवरून केबलचे जाळे दिसते. त्याचबरोबर मोठे वृक्ष, उड्डाण पूल, बसथांबे, मोठमोठे होर्डिंग, घरांवरून केबलचे जाळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्याचे चित्र निदर्शनास येते.

त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण तर होतेच, शिवाय हा प्रकार नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. पूर्वी किमान स्थानिक केबल, इंटरनेट व्यावसायिकांच्या केबलचे जाळे दिसत होते. आता मात्र अनेक मोठमोठ्या व नामवंत कंपन्यांच्या केबल्सची त्यात भर पडलेली आहे.

नागरिकांसाठी जीवघेण्या !

एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर केबल ओढताना संबंधित कर्मचाऱ्यांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात नाही. अनेकदा वेगवेगळ्या भागांतील रस्त्यांवर केबल्स लटकताना दिसतात. रात्रीच्यावेळी केबल न दिसल्याने गणेशखिंड रस्त्यावर दुचाकी घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

२०२१ मध्ये मुंढवा येथे एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर केबल ओढताना संबंधित कर्मचाऱ्याच्या हातातून लोखंडी सळई पायी जाणाऱ्या १२ वर्षीय मुलाच्या डोक्‍यात पडली होती. डॉक्‍टरांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे त्या मुलाचा थोडक्‍यात जीव वाचला. २०१६ मध्ये मुंबईतील गिरगावात केबल काढताना लोखंडी रेलिंग एका तरुणाच्या डोक्‍यात पडल्याने त्याचा मृत्यू झाला होता.

शुल्क टाळण्यासाठी केबल अधांतरी

  • भूमिगत केबल, जलवाहिन्या, गॅसवाहिन्यांसाठी महापालिकेचे नियम ठरलेले

  • संबंधित केबल किंवा अन्य सेवावाहिन्या टाकण्यासाठी महापालिकेची परवानगी घेऊन रीतसर शुल्क भरावे लागते.

  • महापालिकेच्या नियमांचे पालन करावे लागते. नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजीही घेतली जाते.

  • ही सगळी प्रक्रिया आणि महापालिकेचे शुल्क टाळण्यासाठी संबंधित व्यावसायिक अधांतरी केबल टाकतात

  • विशेषतः महापालिकेचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे.

  • पथ विभाग, आकाशचिन्ह विभाग, विद्युत विभागांसह विविध विभाग केवळ बघ्याच्या भूमिकेत

विजेचे खांब, झाडे, इमारतींवरून जाणाऱ्या केबल रस्त्यांमध्ये येतात. त्यामुळे अपघात होतात. महापालिकेने अशा व्यावसायिकांवर कारवाई करून सर्व केबल्स भूमिगत नेण्याची सक्ती करावी.

- आकाश कोंढरे, मुंढवा

महापालिकेच्या स्थायी समितीने केलेल्या ठरावानुसार पथदिवे, झाडे, इमारतींवरून अनधिकृतपणे केबल टाकणाऱ्यांवर कारवाईच्या नोटिसा बजावलेल्या आहेत. महापालिकेच्या विविध विभागांकडून कारवाई केली जाते. यापुढेदेखील ही कारवाई सुरूच राहील.

- साहेबराव दांडगे, अधिक्षक अभियंता, पथ विभाग, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT