पुणे

विद्यार्थी घडविणारी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी!

प्रताप पवार

बारामतीच्या म्युन्सिपाल्टीतील शाळेत १९५७ मध्ये सहावी पास झाल्यानंतर सातवीमध्ये मएसो हायस्कूल येथे प्रवेश घेतला. आमच्या वर्गात पाचवीपासूनच आलेले बरेच विद्यार्थी होते. आम्ही दहा-बारा विद्यार्थी नवखे होतो. त्यामुळे वर्गात ओळख, मैत्री व्हायला काही महिन्यांचा अवधी गेला. मग अनेक मित्र मिळाले. ती मैत्री आजतागायत टिकून आहे. बारामतीतील मएसो हायस्कूल म्हणजे बारामतीतील सर्व कुटुंबीयांना शाळेच्या माध्यमातून एकत्र जोडणारा महत्त्वाचा दुवा होता. शाळेतील बहुतेक शिक्षकांना सर्व कुटुंबांचा परिचय होता. प्रत्येक शिक्षकाचे एक वेगळे वैशिष्ट्य होते. आपटे सर म्हटले, की चित्रकला; भुंजे सर म्हटले, की भूगोल; दामले म्हटले, की संस्कृत; गोडबोले म्हटले, की इंग्रजी; जोशी म्हटले, की गणित वगैरे. यातील प्रत्येक व्यक्ती आजही आमच्या डोळ्यापुढे आहे, कारण त्यांनी आपापल्या विषयाला पूर्ण वाहून घेतले होते. असे शिक्षक आपण कधीच विसरू शकत नाही. शाळेची अनेक वैशिष्ट्य होती. खेळ, कला यांची रेलचेल असे. वर्षातून एकदा मोठ्या स्पर्धा होत असत आणि सारे गाव ते पाहायला लोटत असे. विजेत्यांची चर्चा वर्षानुवर्षे होत असे. ‘एसएससी’ला कोण पहिला आला, त्याची कोणाशी स्पर्धा होती, याच्या चर्चा कायम होत असत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सांघिकतेची आवड 
आम्हाला क्रिकेट, बॅडमिंटन, खो-खो, व्हॉलिबॉल, हुतूतू, टेबल टेनिस असे अनेक खेळ खेळण्यासाठी शाळेकडून सुविधा उपलब्ध करून दिली जात असे. अगदी मल्लखांबही होता. या सर्वांमध्ये खेळाचे शिक्षक श्री. शहाणे हे कायम पुढाकार घेत. यामुळे खेळाची, सांघिकतेची आवड कायमची निर्माण झाली. नववी-दहावीमध्ये असताना द. र. कुलकर्णी प्राचार्य म्हणून आले. डीआरके या नावाने सर्व जण त्यांना संबोधित असत. ते फार उत्तम शिकवायचे आणि कुठल्याही पुढाकारासाठी मदत आणि उत्तेजन द्यायचे. त्यांचा मुलगा अरुण हा माझा मित्र. तो खट्याळ होता आणि त्याचे अभ्यासात लक्ष कमी असे. त्यामुळे डीआरकेंनी दोन वर्षे मला रोज रात्री त्यांच्या घरीच राहायला सांगितले. त्या सर्व शिक्षकांचे आम्हाला मनापासून प्रेम आणि उत्तेजन मिळाले. दामले सरांनी तर तीन वर्षे  एकही रुपया न घेता संस्कृत शिकण्यासाठी त्यांच्या घरी बोलावले. आम्ही काही मित्र संस्कृतचा अभ्यास करत असू. यामुळे अर्थातच माझा व्याकरणाचा पाया अगदी पक्का झाला आणि संस्कृत, संस्कृती याबद्दल आस्था आणि प्रेम निर्माण झाले. शाळेतले हे सगळे दिवस माझ्या शालेय जीवनातील सर्वोत्तम काळ होता. तशीच गोष्ट ‘पिलानी’मध्ये झाली. दोन्ही संस्थांच्या आर्थिक क्षमतेबद्दल फार फरक होता. पिलानीमध्ये जी. डी. बिर्लांसारखा महान उद्योगपती पाठीशी होता, तर बारामतीत बापट नावाच्या त्यागमूर्तीच्या प्रयत्नांतून जन्म घेतलेली ही संस्था होती. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सामाजिक ऋणाचे संस्कार
हायस्कूलमध्ये असताना माझी आई आम्हाला नेहमी सांगत असे, की बाळांनो आज तुमचं शिक्षण उत्तम चाललं आहे. यासाठी तुम्ही बापटांचे ऋण मानले पाहिजेत. त्या माणसाने अर्धपोटी राहून फाटका कोट घालून, लोकांकडून पै-पै गोळा करून शाळा सुरू केली. जमेल त्या प्रमाणात वाढवली आणि मग ही शाळा १९११ साली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने ताब्यात घेतली. बापट, भाऊराव पाटील यांसारख्यांचे सामाजिक ऋण माझे आईवडील मानत असत आणि तेच संस्कार तिने आमच्यावर केले. यामुळे शालेय शिक्षण म्हणजे फक्त प्रवेश घेतला आणि बाहेर पडलो असं झालं नाही. बापटांच्या परंपरेतच आमचे शिक्षक मंडळीसुद्धा आपापल्या परीने त्यांचे योगदान आयुष्यभर देत राहिली. अशा या पार्श्वभूमीमधून आमची शाळा असो अथवा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी असो यांची आठवण, ऋण आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यभर ध्यानात राहिले, हे सांगायला नको. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मनःपूर्वक कृतज्ञता
काळानुसार शाळा आणि संस्था सातत्याने प्रगती करत गेल्या आणि आज जवळपास प्रत्येक शाखेत हजारो विद्यार्थी आहेत. माझे असे प्रामाणिक मत आहे, की ज्या ज्या संस्था अत्यंत निःस्पृह, जीवनभर एका ध्येयाने वाहून घेऊन इतरांसाठी संस्था उभ्या करतात त्याचा पाया कायम भक्कम असतो. यामुळे संस्थापकांनंतर येणारी माणसंसुद्धा त्याच मुशीतून घडल्यामुळे संस्था सातत्याने प्रगती करत राहतात. आम्ही अशाच एका संस्थेमध्ये शिकलो, वाढलो याचा अर्थातच आम्हाला अभिमान आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या संस्थेला किंबहुना परंपरेला यंदा १६० वर्षे पूर्ण होत आहेत. ही संस्था अशीच पुढेही शिक्षण क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात आपले सर्वोत्तम योगदान देत राहील, याबाबत आम्ही माजी विद्यार्थीच नव्हे, तर समाजालासुद्धा खात्री आहे. संस्थेला शुभेच्छा देतानाच मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Train Food : ‘वंदे भारत रेल्वे’त प्रवाशांना आता स्थानिक पदार्थ दिले जाणार ; रेल्वेमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Messi and Revanth Reddy Football Video : लिओनेल मेस्सीने हैदराबादेत मुख्यमंत्री रेवंत रेड्डींसोबत खेळला फुटबॉल; हजारो चाहत्यांचा उत्साह शिगेला!

PMC Retired Employees : निवृत्तीनंतर दिलासा; २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा मोफत वैद्यकीय उपचार!

Pune Health : कर्करोग निदानासाठी पुणेकरांना मोठा दिलासा; महापालिकेचे पेट स्कॅन सेंटर सुरू; खासगी रुग्णालयांपेक्षा निम्म्या खर्चात!

Soybean MSP : आधारभूत किमत खरेदीत शेतकऱ्यांवर अन्याय नको; आमदार डॉ. संजय कुटे यांनी अधिवेशनात मांडली ठाम भूमिका!

SCROLL FOR NEXT