१) एकमेकांच्या सहकार्यातून शेती करीत समाधानी झालेले मगर कुटुंब.
२) एक एकरांत घेतलेले फ्लॉवरचे पीक.
३)महेश मगर यांचे कोथिंबिरीचे पीक व दर्जेदार उत्पादन.
उसातील कोथिंबिरीची नियोजनबद्ध शेती
पुणे जिल्ह्यात देवकरवाडी (मगरवाडी) (ता. दौंड) येथील महेश मगर यांची ऊस, कोथिंबीर, फ्लॉवर आणि कांदा ही मुख्य पिके आहेत. त्यांची हंगामनिहाय उत्तम घडी त्यांनी बसविली आहे. उसात कोथिंबिरीचे आंतरपीक हे त्यांचे मुख्य वैशिष्ट्य़ आहे. या पद्धतीत सातत्य ठेऊन, उत्तम नियोजन व व्यवस्थापन करून त्यात महेश यांनी कौशल्य संपादन केले आहे. व्यापारी जागेवर येऊन कोथिंबिरीची खरेदी करीत असल्याने जागेवरच मार्केट तयार करण्यास यश मिळाले आहे.
...............................................................................
संदीप नवले
...................................................................................
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुका ऊस व भाजीपाला शेतीसाठी प्रसिद्ध आहे. या भागात गुऱ्हाळघरेही भरपूर असल्याने येथील ऊस उत्पादकांना विक्रीचा पर्याय उपलब्ध असतो. तालुक्यातील देवकरवाडी (मगरवाडी) येथील महेश दत्तात्रेय मगर यांची सात एकर वडिलोपार्जित शेती आहे. या शेतीत त्यांनी ऊस, कोथिंबीर, फ्लॉवर आणि कांदा या चारच पिकांना प्राधान्य दिले आहे. शेतीत वर्षभर कोणत्या ना कोणत्या पिकापासून उत्पादन सुरू राहील आणि आर्थिक उत्पन्नाचा प्रवाह कायम राहील या दृष्टीने त्यांनी पीकपद्धतीची रचना केली आहे. या सर्व पिकांमध्ये कोथिंबीर हे मगर यांच्या सर्वात जवळचे पीक आहे. याच पिकाने त्यांचे शेतीचे अर्थकारण भक्कम करण्यास मदत केली आहे. उसासारख्या दीर्घ कालावधीच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून तसेच सलग पद्धतीनेही ते हे पीक घेतात. आंतरपीक पद्धतीत अतिरिक्त उत्पन्न मिळून उसाचा उत्पादन खर्च कमी होतो.
अशी आहे कोथिंबिरीची शेती
दरवर्षी जून- जुलैच्या दरम्यान कोथिंबिरीची लागवड होते. त्यानंतर अल्पावधीतच तणनाशकाचा वापर होतो. कोथिंबीर लागवडीनंतर सात ते आठ दिवसांच्या काळात उसाची रोपांद्वारे लागवड करण्यात येते. रोपे नर्सरीतून घेण्यात येतातत. कोथिंबीर उत्पादनात दर्जेदार बियाण्याची निवड अत्यंत महत्त्वाची असते. बाजारातून दरवर्षी बियाणे खरेदी करण्यात येते. पाने आकर्षक, हिरवीगार आणि बाजारपेठेत मागणी असलेल्या वाणाची निवड होते. एकरी सुमारे ४० किलो बियाण्याची आवश्यकता भासते. सुरुवातीच्या अवस्थेतील व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. पिकाचे वय १५ ते २० दिवसांचे झाल्यावर रासायनिक खतांचा डोस देण्यात येतो. महेश यांनी कोथिंबिरी साठी तुषार सिंचनाचा अवलंब केला आहे. या पद्धतीमुळे पिकाला आवश्यक तेवढेच पाणी मिळते. जमिनीतील ओलावा टिकून राहतो. पाण्याची बचत होते. उन्हाळ्यातही तुषार सिंचनाचा चांगला फायदा मिळतो. पिकाच्या वाढीनुसार आवश्यकतेनुसार बुरशीनाशके, कीटकनाशके आणि शक्तीवर्धकांची फवारणी केली जाते. रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी राहिल्याने पिकाची गुणवत्ता टिकून राहते. त्यामुळे
बाजारपेठेत चांगला दर मिळण्यास मदत होते. साधारण ४० दिवसांमध्ये पीक काढणीस तयार होते. कमी कालावधीत तयार होणारे हे पीक असल्यामुळे वर्षभरातील तीनही हंगामांमध्ये या पिकाचे उत्पादन घेण्याचा महेश यांचा प्रयत्न असतो. यामुळे एका हंगामावर अवलंबून राहावे लागत नाही. आर्थिक जोखीमही कमी होते.
थेट बांधावरच मार्केट
मुख्य हंगामात एकरी सुमारे २० हजार गड्ड्यांपर्यंत तर उन्हाळ्यात १५ हजार गड्ड्यांपर्यंत उत्पादन मिळते. कोथिंबिरीत अनेक वर्षांपासून सातत्य ठेवल्याने व्यापाऱ्यांसोबत चांगले संबंध प्रस्थापित झाले आहेत. बांधावरच थेट मार्केट तयार झाले आहे. कोथिंबीर काढणीस आल्यानंतर व्यापारी थेट शेतावर येऊन पाहणी करतात. त्या वेळची बाजार स्थिती, मालाची गुणवत्ता आणि उपलब्ध उत्पादन यानुसार दर निश्चित केला जातो. दर ठरल्यानंतर व्यापाऱ्यांकडील मजुरांच्या साहाय्यानेच काढणी केली जाते. त्यामुळे मगर यांचे हे श्रम कमी होतात. पुणे शहर व उपनगरातील शेवाळवाडी, शेल पिंपळगाव व गुलटेकडी आदी ठिकाणी ही कोथिंबीर पुढे विक्रीसाठी जाते. थेट व्यवहारामुळे वाहतूक व वेळेची बचत होते. कोथिंबिरीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असते. उन्हाळ्यात उत्पादन तुलनेने कमी आणि मागणी अधिक असल्यामुळे दर जास्त असतात. पावसाळा आणि हिवाळ्यात तुलनेने आवक अधिक असल्याने दरही कमी असतात. वर्षभराचा विचार केला असता सरासरी प्रति गड्डी ८ ते १० रुपयांच्या दरम्यान दर मिळतो. उत्पादनासाठी बियाणे, मशागत, तणनाशके, खते, कीडनाशके आणि मजुरी असा मिळून एकरी सुमारे ३० ते ३५ हजार रुपयांचा खर्च येतो. या पिकातून पुढील पिकासाठी भांडवल तयार होते. नियोजन आणि बाजारपेठेचा अभ्यास असेल तर कोथिंबिरीसारखे पीक कमी कालावधीत चांगला आर्थिक परतावा देऊ शकते याचे उदाहरण महेश यांच्या शेतीने घालून दिले आहे.
........................................................
फेरपालट व चक्राकार पद्धती
महेश यांच्या शेतात वर्षभर उत्पन्नाचा ओघ सुरू असतो. उसाचे एकरी ८० टनांपासून ते १०० टनांपर्यंत उत्पादन मिळते. आपला ऊस ते त्या वेळची दराची स्थिती पाहून गुऱ्हाळघर किंवा साखर कारखान्याला देतात. अलीकडे गुळासाठी म्हणून उसाला प्रति क्विंटल ३५०० रुपयांपर्यंत तर कारखान्याला तीनहजार रूपये दर सुरू असल्याचे महेश यांनी सांगितले. गुऱ्हाळासाठी ऊस दिल्यास १३ ते १४ महिन्यांनी उसाचे रान मोकळे होते. त्यानंतर डिसेंबरपर्यंत कांद्याच्या लागवडीसाठी थांबावे लागते. त्या काळात पुन्हा एकदा कोथिंबिरीचे पीक घेऊन उत्पन्न मिळवण्याची संधी मिळते. एकरी १५ टनांपर्यंत कांद्याचे उत्पादन साध्य केले आहे. साठवणुकीसाठी चाळ तयार केली आहे. त्यामुळे बाजारपेठ पाहून टप्प्याटप्प्याने कांद्याची विक्री करता येते. सध्या किलोला २१ रुपये दर मिळतो आहे. महेश सांगतात की उसाचा खोडवा घेण्यापेक्षा फेरपालटीला मी अत्यंत महत्त्व दिले आहे. त्यामुळे जमीन जीवंत अर्थात सुपीक राहते. बेवड चांगला राहतो. त्यांना आई सुनिता, वडील दत्तात्रेय, पत्नी रूपाली यांची साथ मिळते. अनुराज व आद्या अशी दोन गोंडस मुले त्यांना आहेत. सर्वांच्या पाठबळावर आयुष्य समाधानी करण्यात त्यांनी यश मिळवले आहे.
महेश मगर- ८९७५७०००४४, ९०६७७११९९१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.