MLG26B03193
माळीनगर (ता. माळशिरस) : येथील परिसरात पक्ष्यांची भरत असलेली रात्रशाळा.
माळीनगरात दररोज भरतेय पक्ष्यांची रात्रशाळा
...........
शिरस, अशोक, निलगिरी वृक्ष हजारो पक्ष्यांचे ठरताहेत आश्रयस्थान
.......
माळीनगर, ता. २७ : ब्रिटिशकाळात उभारणी झालेला म्हणून ओळखला जाणारा माळशिरस तालुक्यातील माळीनगर येथील साखर कारखान्याच्या परिसरात कित्येक वर्षांपासून विविध हजारो पक्ष्यांची येथे दररोज रात्रशाळा भरत आहे. माळीनगर परिसरात कोणताही जलाशय नसताना येथे पक्ष्यांची मांदियाळी असते, हे विशेष.
येथे ८० वर्षांपूर्वीचे शिरस, अशोक, निलगिरी, कडुनिंब, जांभूळ येथील भलेमोठे उंच वृक्ष हजारो पक्ष्यांचे आश्रयस्थान ठरले आहेत.
सायंकाळचे सावट दाटू लागले की आकाशातून पोपटांचे थवे, कावळ्यांची कावकाव, घारींची घिरट्या आणि साळुंक्यांची चिवचिव, बगळे, घारी यासारख्या पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो. क्षणात संपूर्ण परिसर पक्ष्यांच्या आगमनाने दुमदुमून जातो. झाडांच्या फांद्यांवर जागा मिळवण्यासाठी चालणारी त्यांची लगबग पाहण्यासारखी असते. यावेळी होणाऱ्या पक्ष्यांच्या नयनमनोहारी कसरती पाहून उपस्थितांची मने प्रफुल्लित होतात. त्यानंतर काही क्षणांतच वृक्षराजी हिरव्या-पिवळ्या, काळ्या-करड्या पंखांनी नटून जाते. रात्रभर हे हजारो पक्षी याच वृक्षांवर विसावतात. माळीनगर कारखान्याचे सुरक्षारक्षक इथल्या पक्ष्यांची शिकार होऊ देत नाहीत.
पहाटेच्या मंद वाऱ्यासह सूर्योदयाची चाहूल लागताच पुन्हा एकदा किलबिलाट उसळतो आणि हे पक्षी खाद्याच्या शोधार्थ चारही दिशांना उडून जातात.काही क्षणांतच गजबजलेला परिसर पुन्हा शांत होतो.
निसर्गप्रेमींसाठी नवे केंद्र
पक्ष्यांच्या या सततच्या वावरामुळे कारखाना परिसरातील भिंती, रस्ते त्यांच्या विष्ठेमुळे पांढरफटक पडतात. मात्र, स्थानिक नागरिकांच्या मते, ही अस्वच्छता नसून निसर्गाने दिलेली जिवंत साक्ष आहे की औद्योगिक वातावरणातही जैवविविधतेचा सुंदर मिलाफ शक्य आहे. औद्योगिक परिसर आणि निसर्ग यांचे असे सहअस्तित्व माळीनगरच्या ओळखीला एक वेगळीच छटा देत आहे. दररोज संध्याकाळी रंगणारा हा पक्ष्यांचा सोहळा पाहण्यासाठी अनेक जण खास वेळ काढून या क्षणाचा आनंद घेतात. निसर्गप्रेमींसाठी हा परिसर आकर्षणाचे नवे केंद्र ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.