पुणे

Loksabha 2019 : दिल्ली कनेक्‍शनच्या जोरावरच जोशींची बाजी

संभाजी पाटील

पुणे - प्रत्येक दिवशी इच्छुकांपैकी एकाचे नाव आघाडीवर, आज अरविंद शिंदे उद्या प्रवीण गायकवाड, तिसऱ्या दिवशी मोहन जोशी, चौथ्या दिवशी अभय छाजेड. कधी मराठा हवा, तर कधी ब्राह्मण. कधी निष्ठावंत, तर कधी काँग्रेसला चैतन्य देणारा बाहेरचा उमेदवार... गेली पंधरा ते वीस दिवसांपासून पुण्यात काँग्रेसच्या उमेदवार निवडीबाबत सुरू असलेल्या चर्चेत माजी आमदार मोहन जोशी या ‘निष्ठावंता’ने बाजी मारली. प्रचंड रस्सीखेच असतानाही जोशी यांनी अखेरच्या क्षणापर्यंत शांत बसून बाजी मारली ती दिल्लीतील ‘स्ट्रॉग कनेक्‍शन’च्या बळावरच! 

गेल्या पाच वर्षांत पुण्यातील काँग्रेसमध्ये मोठी पडझड झाली. अशा परिस्थितीत पक्षाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी लोकसभेत उमेदवारी देताना नवा प्रयोग केला जाईल, असे सांगितले जात होते. मात्र, इच्छुकांमध्ये नेहमीचीच नावे समोर आली. निष्ठावंतांना न्याय या नावाखाली बाहेरच्या नावांचा पत्ता कापला गेला. शिंदे, छाजेड आणि जोशी या तिघांची नावे प्रदेश काँग्रेसच्या वतीने दिल्लीत गेली होती. त्यानंतर खासदार संजय काकडे यांनी काँग्रेसची उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न केला. प्रदेशाध्यक्ष व दिल्लीतील काही नेते काकडे यांच्या नावावर अनुकूल होते; पण भाजप की काँग्रेस याबाबत काकडे ठाम नव्हते. ते आले तर निष्ठावंत नाराज होतील व काँग्रेसमधून त्यांना सहकार्य मिळणार नाही, या कारणाने त्यांचे नाव मागे पडले. त्यानंतर प्रदेश काँग्रेसच्या यादीत नसलेले; पण राहुल गांधी यांच्या खास टीमकडून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचे नाव समोर आले. राष्ट्रवादी काँग्रेसनेही हे नाव लावून  धरले. 

गायकवाड यांच्या नावाला मिळालेला प्रतिसाद पाहून काँग्रेसच्या सर्व इच्छुकांनी एकत्र येत त्यांनी गायकवाड यांच्याविरोधात जोरदार मोहीम चालवली. एका इच्छुकाने गायकवाड यांचे संभाजी ब्रिगेड कनेक्‍शन, ‘भांडारकर’ची तोडफोड, दादोजी कोंडदेव पुतळा हटविण्याचे प्रकरण, त्यांचे ‘बामसेफ’ सोबतचे संबंध आणि पुण्यातील ब्राह्मण कसा दुखावला असता, याची  कुंडलीच पुराव्यांसह दिल्ली दरबारी सादर केली. याशिवाय गायकवाड हे राष्ट्रवादीचेच उमेदवार आहेत, राष्ट्रवादीने पाठविलेला माणूस काँग्रेसने स्वीकारायचा काय, असा प्रश्‍न उपस्थित केला गेला. अखेरच्या क्षणापर्यंत काँग्रेसश्रेष्ठींपुढे हा मुद्दा रेटला गेला. 

पुण्यात आतापर्यंत दहा वेळा ब्राह्मण उमेदवार विजयी झाल्याचा युक्तीवादही जोशी यांना उपयुक्त ठरला. त्यामुळे गायकवाड आणि शिंदे यांचे नाव मागे पडले. तत्पूर्वी शिंदे यांचे नाव निश्‍चित झाले, असे सांगून त्यांना काम करण्यासही सांगण्यात आले होते; पण त्यांनाही उमेदवारी नाकारली. यामागे पुण्यात काँग्रेसचे नवे नेतृत्व नकोच, त्यातही मराठा समाजाचा एखादा खासदार झालाच, तर आपले महत्त्व कमी होईल, ही स्थानिक नेत्यांना भीती होती, त्यामुळे शिंदे यांचाही पत्ता कट झाल्याचे बोलले जाते. जोशी यांनी दिल्लीत आपली मांडलेली बाजू, त्यांनी केलेले ‘प्रोफाइल प्रेझेंटेशन’ आणि ‘निष्ठावंत’ या त्यांच्या जमेच्या बाजू ठरल्या. 

अनेक नेत्यांकडून शिफारस
जोशी यांनी १९९९ ची लोकसभा लढविली होती. त्यात त्यांना २ लाख १३ हजार मते मिळाली होती. याशिवाय जोशी यांचे दिल्लीत अहमद पटेल यांचे जवळचे संबंध होते. मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांचेच नाव अखेरपर्यंत लावून धरले. प्रियांका चतुर्वेदी यांच्यासह महाराष्ट्रातील पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील आणि विश्‍वजित कदम यांनीही जोशी यांनाच प्राधान्य दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Latest Marathi News Live Update : कर्नाटकात दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार

SCROLL FOR NEXT