पुणे - किरकोळ कारणावरून झालेल्या वादामुळे पतीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल केला. खटल्याची सुनावणी सुरू असताना दोघांचेही समुपदेशन करण्यात आले. त्यातून त्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णयही घेतला. मात्र सुनेला परत घरात आणले, तर आम्हाला विसरून जा, अशी धमकी मुलाला आई-वडिलांनी दिली.
पती-पत्नीला एकत्र राहून प्रपंच करायची इच्छा असूनही पालकांच्या भूमिकेमुळे त्यांना विभक्त व्हावे लागणार, अशी स्थिती या खटल्यात निर्माण झाली आहे. प्रवीण आणि पूनम (नावे बदललेली आहेत.) यांच्या बाबतीतला हा प्रसंग. दोघेही उच्चशिक्षित असून, आयटी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करतात. त्यांना रोहन नावाचा मुलगा आहे. रोहन दोन वर्षांचा झाल्यानंतर त्यांच्यात किरकोळ कारणांवरून वाद होऊ लागले. त्यामुळे प्रवीणने घटस्फोटाचा दावा दाखल केला होता. सुनावणीत दोघांचेही समुपदेशन करण्यात आले. विभक्त झाल्यास दोघांच्याही आयुष्यावर वाईट परिणाम होतील. तसेच मुलाची फरफट होईल. या वयात दुसरे लग्नही अवघड असते, अशा अनेक बाबी त्यांना समजावून सांगण्यात आल्या. त्यामुळे भविष्यातील धोके लक्षात घेऊन त्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा निश्चय केला. मात्र त्यांचा हा निर्णय प्रवीणच्या आई-वडिलांना मान्य नव्हता. त्यांना पूनम घरात नकोच होती. त्यामुळे त्यांनी प्रवीणला संपत्तीतून बेदखल करण्याची धमकी दिली, अशी माहिती हा खटला चालविणाऱ्या ॲड. सुनीता जंगम यांनी दिली.
मुलांच्या संसारात आई-वडिलांनी जास्त लक्ष घालू नये. त्यांना निर्णय घेण्याची सवय लावावी. त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढेल. या प्रकरणात आई-वडिलांचे समुपदेशन व्हायला हवे. सुशिक्षित म्हणवून घेणारी पिढीच संसार टिकवण्यात कमी पडत आहे.
- सुनीता जंगम, वकील
पत्नी की आई-वडील?
समजून घेऊन संसाराला उभारी देण्याऐवजी आई-वडिलांनी संसार मोडण्याच्या अटी घातल्याने प्रवीण भांबावून गेला. त्यात त्याची नोकरी गेली होती. आर्थिक बाबींसाठी वडिलांवर अवलंबून असल्याने पत्नीची की आई-वडिलांची साथ द्यावी, या द्विधा मनस्थितीत तो अडकला. आत्तापर्यंत आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय वडिलांनी घेतल्याने त्याला या प्रसंगात काय भूमिका घ्यावी, हे समजेना. सध्या या दाव्याची सुनावणी सुरू असून, लवकरच त्याचा निकाल येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.