पारगाव - आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पारगाव हे महत्त्वाचे गाव असल्याने या ठिकाणी नवीन पोलिस ठाण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या गृह विभागाकडे पाठविला जाईल, अशी माहिती जिल्हा (ग्रामीण) पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.
पारगाव (ता. आंबेगाव) येथील पोलिस औट पोस्टचे उद्घाटन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाटील होते. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी अतिरिक्त पोलिस अधीक्षक संदीप जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मानसिंग पाचुंदकर, सूर्यकांत पलांडे, अरुण गिरे, राजाराम बाणखेले, संजय गवारी, दौलत लोखंडे, सरपंच बबन ढोबळे, उपसरपंच सुनंदा ढोबळे आदी उपस्थित होते.
संदीप पाटील म्हणाले, ‘‘प्रत्येक गावात ग्रामरक्षक दल स्थापन करून रात्रीच्या वेळी गस्त घातली पाहिजे. ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांना ओळखपत्रांचे वाटप केले जाईल, महिला सुरक्षा समितीच्या सदस्यांनी छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी प्रबोधन केले पाहिजे. पोलिस पाटलांचा लवकरच जिल्हास्तरीय मेळावा घेतला जाईल.’’
वळसे पाटील म्हणाले, ‘‘पोलिस विभागाकडून अन्यायाविरुद्ध न्याय मिळतो, ही भावना निर्माण झाल्यास नागरिक धाडसाने पुढे येतील. या भागात पोलिसांना रात्रीच्या वेळी गस्तीसाठी तसेच रुग्णांसाठी रुग्णवाहिका अशा दुहेरी उपयोगासाठी वाहन उपलब्ध करून देण्याबाबत भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक मंडळ विचार करेल.’’ पोलिस निरीक्षक प्रदीप जाधव यांनी प्रास्ताविक, नीलेश पडवळ यांनी सूत्रसंचालन केले. बबन ढोबळे यांनी आभार मानले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.