Davadi Nimgav Khandoba Temple
Davadi Nimgav Khandoba Temple sakal
पुणे

Khandoba Temple : पुणे परिसर दर्शन : दावडी निमगावचे खंडोबा मंदिर

सकाळ वृत्तसेवा

निमगाव नावाची बरीच गावे आहेत, त्यामुळे त्याच्या जवळच्या गावावरून किंवा एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीवरून गाव ओळखले जाते. राजगुरुनगर जवळ असलेले निमगाव हे दावडी गावावरून दावडी निमगाव किंवा खंडोबा मंदिरावरून खंडोबाचे निमगाव असे ओळखले जाते.

खंडोबा देवस्थानसंबंधी सगळ्यात जुना उल्लेख मार्गशीर्ष शुद्ध पंचमी शके १३४७ म्हणजे २६ नोव्हेंबर १४२४ रोजीचा आहे. निमगावपासून दीड किलोमीटरवर २४ फूट उंचीचा तट आपले लक्ष वेधून घेतो. मंदिर छोट्या टेकडीवर आहे. मंदिराला तीन बाजूंनी दरवाजे आहेत. यातील पश्चिम आणि दक्षिणेकडील दरवाजे बंद असतात. पूर्वेकडच्या दरवाजात प्रवेशाआधी गणपती आणि हनुमान विराजमान आहेत.

आत गेल्यावर उजव्या हाताला दोन दगडी घोडे आणि एक तुळशी वृंदावन आहे. समोरच नंदी मंडपात नंदी महाराज विसावले आहेत. तेथेच चिमाजी अप्पांनी आणलेली पोर्तुगीज घंटा आहे. शेजारीच दोन दीपमाळा आहेत. मंदिरात शंकराची पिंड असून बाणाई, म्हाळसा, मल्हारी, भैरव आणि जोगेश्वरी यांच्या धातूच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्यामागे प्रदक्षिणा मार्गावर एका कोनाड्यात म्हाळसाबाई शिळा आणि महिषासुर मर्दिनी भवानीची दगडात कोरलेली मूर्ती आहे.

या मंदिराचे पुनर्निर्माण १७३८ मध्ये गंगाधर यशवंत आणि बाजी गंगाधर चंद्रचूड यांनी केले. मंदिराच्या कोटाचे काम १७६९ मध्ये बडोद्याचे मल्हारराव गायकवाड यांनी केले. येथे पेशवाईतील या भागाचे वतनदार चंद्रचूड यांचा गढीवजा वाडा आहे. पुण्यातील शनिवार वाड्याची आठवण येईल असे प्रवेशद्वार आहे. मुख्य दरवाजाबाहेर महादेवाचे मंदिर आहे. शेजारी भीमा नदीचे विस्तीर्ण पात्र आहे. वाड्याच्या तटाला लागूनच ग्रामपंचायतीने उत्तम उद्यान विकसित केले आहे.

यात श्री गणेश आणि लक्ष्मी विष्णू मंदिर आहे. दावडी येथे श्रीमंत दामाजीपंत गायकवाड यांची गढी बघायला जाता येते. या गढीत रयत शिक्षण संस्थेची शाळा आहे. गढीचे प्रवेशद्वार उत्तम स्थितीत आहे. बाहेर दोन छोट्या तोफा आहेत. वाडा आतून पूर्ण जमीनदोस्त झाला आहे. जवळच कन्हेरसर या गावीसुद्धा चंद्रचूड यांचा वाडा आहे, तो चांगल्या स्थितीत आहे. या गावातील यमाई देवीचे मंदिर सुप्रसिद्ध आहे.

काय पहाल?

खंडोबा मंदिर, मंदिराची तटबंदी, नंदी मंडप, पोर्तुगीज घंटा, खंडोबा, बानूबाई, म्हाळसा, चंद्रचुड यांचा वाडा, रमणीय नदीकाठ, महादेव, गणेश आणि लक्ष्मी विष्णू मंदिर.

कसे पोहचाल

राजगुरुनगर येथून बसने जाता येते.

- सतीश मराठे, इतिहासप्रेमी-गिर्यारोहक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

हसताय ना, हसलंच पाहिजे!

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT