पुणे - प्लायवूड व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना दरवर्षी परवाना नूतनीकरण करणे आवश्यक असते. त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे १४ परवाने घ्यावे लागतात. तसेच या व्यवसायासाठी बांधलेल्या अतिरिक्त शेडवरही मोठ्या प्रमाणात कर आकारणी केली जाते. त्यामुळे शहरातील प्लायवूड व्यावसायिक त्रस्त झाले आहेत.
‘पूना प्लायवूड डीलर्स असोसिएशन’ची बैठक ‘सकाळ’ने आयोजित केली होती. त्या वेळी संघटनेच्या प्रतिनिधींनी प्लायवूड व्यवसायासमोरील समस्या मांडल्या. या बैठकीस विजय संघवी, अशोक शहा, मोहन पटेल, रोहित पटेल, महेश दलाल, सुरेश पटेल, राजेंद्र शहा, तुलसी पटेल, शंकर पटेल, कैलाश शहा, अनुभव भुतडा आणि व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळिया उपस्थित होते.
टिंबर मार्केटमधील दुकानांच्या खुल्या आवारात लाकडे ठेवण्यात येत, मात्र या व्यापाऱ्यांनी प्लायवूडचा व्यवसाय सुरू केल्यावर शेडची गरज भासू लागली. या अनेक वर्षांपूर्वी बांधलेल्या शेड्सवर महापालिकेने २०१३मध्ये नवीन दराने कर आकारणी सुरू केली. त्यामुळे या व्यापाऱ्यांना अनेक पटीने कर द्यावा लागत आहे. त्यामुळे शेडसाठी जुन्या दराने कर आकारणी करावी. त्याचबरोबर वेगवेगळ्या १४ परवानग्यांऐवजी तीनच परवाने देण्याची सोय केली जावी, अशा मागण्या या वेळी संघटनेच्या प्रतिनिधींनी केल्या. तसेच टिंबर मार्केटमध्ये दोन ते तीन मजली बांधकामांना परवानगी मिळावी, वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यात यावा, याही आमच्या मागण्या असल्याचे या प्रतिनिधींनी नमूद केले.
शहरात प्लायवूड व्यवसायाला १९६० नंतर सुरवात झाली. मात्र. १९८०च्या दशकात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला. टिंबर मार्केट, भवानी पेठ, कोथरूड, बाणेर असा या व्यवसायाचा विस्तार होत गेला. पुण्यात मुख्यतः हरियाना, पंजाब व बिहार राज्यांतून प्लायवूड येते. प्लायवूड निर्मितीत गुजरातमधील कंपन्यांच्या मोठा वाटा आहे. प्लायवूडची आयात नाममात्र स्वरूपात होते, जवळपास ९५ टक्के प्लायवूड देशात निर्माण केले जाते.
संघटनेबाबत...
स्थापना १९८८
शहरात एक हजार प्लायवूड व्यावसायिक
सदस्य संख्या ४५०
व्यवसायाची शहरातील वार्षिक उलाढाल दोन हजार कोटी
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.