पुणे : पुणे जिल्ह्याच्या २०२०-२१ च्या प्रारूप वार्षिक विकास आराखड्यात कृषी, ग्रामीण विकास, पाटबंधारे, पूरनियंत्रण, ऊर्जा, खाणकाम, उद्योग आणि विविध विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध नावीन्यपूर्ण योजनांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्याचा आगामी आर्थिक वर्षासाठीचा ६४९ कोटी ७२ लाख रुपयांची तरतूद असलेला वार्षिक आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याला शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
या आराखड्यातील एकूण प्रस्तावित निधीपैकी सर्वसाधारण योजनांसाठी ५२० कोटी ७८ लाख रुपयांची तर, अनुसूचित जाती उपयोजनांसाठी १२८ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या बैठकीत सांगितले. शिवाय जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी १७८ कोटी २१ लाख रुपयांचा अतिरिक्त निधीही उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली.
पालकमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, शहर व जिल्ह्यातील आमदार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, खासदार गिरीश बापट, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार वंदना चव्हाण, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, पिंपरी चिंचवडचे पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘शिक्षण विभागाला आवश्यक त्या सुविधा पुरविणे आवश्यक आहे. त्यामुळे शाळेच्या इमारतींचे बांधकाम, विशेष दुरुस्ती, स्वच्छतागृहांचे बांधकाम यासह युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकासाच्या योजना, क्रीडा विभागाअंतर्गत आवश्यक सुविधा, शहरांबरोबरच ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी पुरेसा निधी. छोट्या व मोठ्या ग्रामपंचायतींना सुविधा पुरविण्यासाठी विशेष अनुदान दिले जाईल. रस्त्याची कामे गतीने व दर्जेदार पद्धतीने करावीत. पुण्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करा.’’
सरकारी जागांवरील अतिक्रमणे हटवा - अजित पवार
दरम्यान, पालिकेच्या हद्दीतील सरकारी जागांवरील अतिक्रमणे त्वरित हटवा. यानुसार येत्या प्रजासत्ताक दिनाची डेडलाइन ठरवा, असा आदेशही पवार यांनी या वेळी प्रशासनाला दिला. खासदार वंदना चव्हाण यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.