Tanishka Stree Pratishtha Abhiyan
Tanishka Stree Pratishtha Abhiyan 
पुणे

... अन एकाचवेळी ओलांडले गेले हजारो 'उंबरठे' !

सकाळवृत्तसेवा

पुणे: एरवी ‘लटपट लटपट चालणं‘ आणि ‘मंजूळ मैने‘चं बोलणं अशी सर्वकालीन ओळख करून दिली गेलेली स्त्री-जात जेव्हा आपले असे अनेक सामाजिक-कौटुंबिक आणि खरंतर मानसिक ‘उंबरठे‘ ओलांडू लागते, तेव्हा नक्की काय होत असेल, याचा प्रत्यक्ष प्रत्यय शनिवारी लाखो पुणेकरांनी घेतला. स्वतःचा, स्वतःच्या कुटुंबाचा आणि पर्यायाने एकूण समाजाचाच विकास करण्याच्या ध्यासाने पेटलेल्या या ‘ध्यासवेड्या‘ महिला जेव्हा ‘तनिष्का‘ निवडणुकीसाठी रस्त्यांवर उतरल्या, तेव्हा समाजातल्या या उर्वरित पन्नास टक्के भागाचं महत्त्वही लोकांना नकळतपणे जाणवून आलं...

महिलांच्या उन्नयनासाठी, प्रगतीसाठी एक हक्काचं व्यासपीठ असावं या हेतूने ‘सकाळ‘तर्फे ‘तनिष्का‘ व्यासपीठ सुरू करण्यात आलं, त्यावेळीही कदाचित 15 ऑक्टोबर 2016 चा शनिवार म्हणजे एवढा अलोट उत्साहाचा आणि महिलांना ‘स्व‘ची ओळख करून देणारा ठरेल, याचा स्पष्ट विचार कुणाच्या मनांत आला नसेल. पण आज तसं झालं खरं... आणि हे घडवून आणलं होतं ते त्याच खंबीर आणि आत्मविश्वास कमावलेल्या महिलांनी, ज्यांना कधीकाळी तनिष्कानेच हात दिला होता. म्हणूनच की काय पण अवघं पुणे शहर सकाळी सात वाजल्यापासूनच उत्साहप्रवाहित झालं होतं.

यंदा पहिल्यांदाच होणार असल्याने तनिष्का निवडणुकांचा उत्साह, त्यांतली उत्सुकता आणि प्रत्येकीच्या अंगची आपसूक लगबग ही अर्थातच शहरभर असणाऱ्या विविध केंद्रांवर दिसून येत होतीच. विशेष म्हणजे, ‘मी माझ्यासाठी आलेय आणि मी ‘तिच्या‘साठीही आलेय‘ ही परस्पर जाणिवेची भावनाही या सगळ्या उत्साही प्रपंचाचा अविभाज्य भागच म्हणून पुढे आल्याचंही दिसून येत होतं.

कुणी होती गृहिणीच्या भूमिकेतली, तर कुणी होती थेट आयटी इंजिनियरच्या ‘व्हाइट कॉलर‘ वेशातली... कुणी होती कष्टकरी वर्गातली, तर कुणी महाविद्यालयीन तरुणी... कुणी-कुणी तर आयुष्याची संध्याकाळ अनुभवणारी... पण या प्रत्येकीच्या आतली ‘ती‘ मात्र आज एकाच नावाने जणू ओळखली जात होती, अन ते होतं तनिष्का !

शहरातल्या सुमारे दीडशे केंद्रांवर एकाचवेळी सुरू असणाऱ्या या मतदानाने अशा अनेक तनिष्का एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. या निवडणुका काहींना नवी उमेद देत होत्या, तर काहींच्या मनांत महात्त्वाकांक्षेचे धुमारे फोडत होत्या. आज सहावारी, नऊवारी साड्या, पंजाबी ड्रेस आणि अगदी जीन्स-टीशर्ट सुद्धा एकमेकांच्या सोबत उभ्या राहिल्याचे चित्र होते...

* वेळ आठची, उपस्थित सातपासूनच !
निवडणुकांची वेळ सकाळी आठची असली, तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी सकाळी सातपासूनच महिलांची आणि उमेदवारांच्या उत्साही पाठीराख्या सोबतीणींची उपस्थिती दिसून आली. शहर आणि उपनगर भागांत हेच दृश्य समान होते.

* महिला म्हणजे हळदीकुंकू आलंच...
महिला म्हटल्या की ‘हळदीकुंकू‘ आलंच ! आज तनिष्का निवडणुकांत सुद्धा हळदीकुंकू अनुभवायला मिळालं. अनेक केंद्रांवर मतदानाची सुरवातच हळदीकुंकू करून झाली. या वेळी वातावरणातला उत्साह पाहण्यासारखा होता.

* शेकडोंनी केंद्र, हजारोंनी मतपत्रिका, लाखोंनी मतदार
146 केंद्र, 401 उमेदवार, प्रत्येक केंद्रावर हजारोंनी मतपत्रिका आणि शहरभर लाखोंनी मतदान केलेले मतदार... एवढा प्रचंड पसारा या तनिष्का निवडणुकीने अनुभवला. महत्त्वाचं म्हणजे सुरळीत निवडणुकीचा पायंडाही घालून दिला.

* ‘महिला‘ जात आणि ‘माणूस‘ धर्म
तनिष्का निवडणुकांना मिळालेल्या महिलांच्या ‘न भूतो‘ प्रतिसादाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मतदानात सहभागी झालेल्या सर्व जाती-धर्मांच्या महिला. वेळात वेळ काढून प्रत्येक जणीने आपला हक्क आणि ‘कर्तव्य‘ बजावलं. या वेळी एका आज्जींचे शब्द मोठे बोलके होते. त्या म्हणाल्या- आमची जात ‘महिला‘ आणि धर्म आहे ‘माणूस‘!

* सोशल मीडिया, मिस्ड कॉल्स जोरात !
एकीकडे रांगाच रांगा लावून मतदान होत असतानाच दुसरीकडे त्याहूनही प्रचंड वेगाने मिस्ड कॉल्स मधून मतदान केलं जात होतं. अनेकजणांनी हा दुसरा पर्याय पसंत केला. शिवाय, व्हाट्सअँप, फेसबुक आणि ट्विटर तर दिमतीला होतेच !

* चिमुकल्यांना घेऊन हजर
अनेक मतदार ‘तनिष्का‘ आपल्या चिमुकल्यांना घेऊन मतदान करायला आल्या होत्या. चिमुकलेही मोठ्या उत्साहाने या सगळ्या गोष्टी आपल्या छोटुकल्या कुतूहलभरल्या डोळ्यांत टिपून घेताना दिसत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT