पुणे

घोटाळेबाजांना माफी नाही - बापट

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - राष्ट्रवादी काँग्रेसने शहराचा विकास केला म्हणजे उपकार केले नाहीत, जनतेने त्यासाठीच त्यांना निवडून दिले होते; पण विकास करताना त्यांनी जो भ्रष्टाचार केला, त्याला कोणी परवानगी दिली. त्यांच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळूनच पिंपरी-चिंचवडकरांनी भाजपच्या हाती सत्ता सोपविली आहे. यापुढील काळात घोटाळेबाजांना माफी नाही, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापनेपासून (१९८६) आजवर पहिल्यांदाच विरोधी पक्षाकडे म्हणजे भाजपकडे स्पष्ट बहुमताने पिंपरी-चिंचवडकरांनी सत्ता सोपविली आहे. १२८ पैकी ७८ जागा या पक्षाला मिळाल्या आहेत. जनतेने दिलेला कौल आम्ही नम्रपणे स्वीकारतो, तसेच भाजपवर जो विश्‍वास दाखविला त्याबद्दल जनतेचे आभार व्यक्त करतो, अशा शब्दांत बापट यांनी निवडणूक निकालाचे स्वागत केले.

पत्रकार परिषदेला खासदार अमर साबळे, भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, एकनाथ पवार, महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस उमा खापरे, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, महेश कुलकर्णी, बाबू नायर, सारंग कामतेकर, प्रमोद निसळ, अमोल थोरात व पक्षाचे नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते.

महापालिकेतील भ्रष्टाचाराचा उल्लेख करून बापट म्हणाले, ‘‘राष्ट्रवादीने विकास केला तेवढाच भ्रष्टाचार केला. अनेक प्रकरणांची चौकशी आता सुरू आहे. त्यांनी केलेल्या सर्व घोटाळ्यांचा पर्दाफाश केला जाईल. ज्यांनी पैसे खाल्ले, जे चौकशीत दोषी आढळतील त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल. कोणालाही माफ केले जाणार नाही. जनतेने विश्‍वासाने आम्हाला निवडून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पारदर्शी कारभारावर जनतेने विश्‍वास व्यक्त केला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख होईल असा शहराचा विकास केला जाईल.’’

भाजपचा जाहीरनामा पाच वर्षांत पूर्ण करावयाचा असल्याचे सांगून बापट म्हणाले, ‘‘आम्ही जो जाहीरनामा प्रसिद्ध केला, त्यावर काम केले जाईल.

काम होते की नाही यासाठी काही तज्ज्ञ मंडळी, पत्रकारांना बरोबर घेऊन दर तीन महिन्यांनी आढावा बैठक घेतली जाईल. ही अभिनव पद्धत मी स्वत: राबविणार आहे. एकीकडे स्वच्छता, पाणीपुरवठा, विद्युतीकरण अशा मूलभूत सुविधा पुरविताना शहराच्या पायाभूत (इन्फ्रास्ट्रक्‍चर) विकासावर भर दिला जाईल. निगडीपर्यंत मेट्रो, पुणे-लोणावळा तिसरा लोहमार्ग, ‘पीएमपीएमएल’बरोबरच रिंगरोड विकसित करून वाहतुकीचा प्रश्‍न अग्रक्रमाने हाती घेतला जाईल. मोशीतील आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र विकसित केले जाईल. औद्योगिकनगरीचे महत्त्व लक्षात घेऊन औद्योगिक प्रशिक्षण केंद्रही विकसित केले जाईल. पर्यटनाच्या दृष्टीने शहर विकसित केले जाईल. पुण्याच्या लोहगाव विमानतळाला काही महिन्यांपूर्वी १२ एकर जागा दिली होती. आता आणखी १८ एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे. त्याचा फायदा पुण्याबरोबरच पिंपरी-चिंचवडला होईल.’’

जनतेचा विश्‍वास सार्थ ठरवू...
विकास हा आमचा प्रचाराचा केंद्रबिंदू होता. गेल्या अडीच वर्षांत राज्य व केंद्र सरकारने शहराच्या दृष्टीने जे निर्णय घेतले, त्याबद्दल जनतेच्या मनात विश्‍वास निर्माण झाल्यानेच आमचा मोठा विजय झाला. आता जबाबदारीही वाढली, त्याची आम्हा सर्वांना जाणीव आहे. जनतेचा विश्‍वास आम्ही सार्थ ठरवू, असा विश्‍वासही बापट यांनी व्यक्त केला.

सर्वसंमतीने महापौरांची निवड
पिंपरी-चिंचवडच्या नव्या सदस्य मंडळात भाजपचे इतर मागास प्रवर्गातील २४, अनुसूचित जाती प्रवर्गातून २० पैकी १४ व भटक्‍या विमुक्त जमाती प्रवर्गातून ३ उमेदवार विजयी झाले आहेत. निवडून आलेल्या ७८ उमेदवारांत ४१ महिला व ३७ पुरुष आहेत. एकूण ७५ टक्के जागांवर भाजपने विजय मिळविला आहे. नवा महापौर हा ओबीसी पुरुष प्रवर्गातून ठरविला जाणार आहे. त्यासाठी अगोदर स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. सर्वसंमतीने नाव निवडून माझ्यासह कोअर समितीची बैठक होईल. त्यानंतर मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करून सर्वसंमतीने नवा महापौर निवडला जाईल, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajiv Gandhi : राजीव गांधींच्या हत्येबाबत इस्रायलने आधीच दिली होती सूचना, नंतर महत्त्वाचे दस्तावेज गायब; एक्स्पर्टचा दावा

CCF Tea For Thyroid : Thyroid वर मात करायची असेल तर CCF चा हेल्दी चहा प्या, नक्की फरक पडेल

Fake Deepfake's : खऱ्या किंवा एडिटेड व्हिडीओजना लावलं जातंय 'डीपफेक' चं लेबल

Lok Sabha Poll 2024 : ठाकरे गटाचा आणखी एक उमेदवार रिंगणात ? माजी महापौर रमेश म्हात्रे यांनी भरला उमेदवारी अर्ज

Jalgaon News : अपघातातील जखमीला उपचारासाठी न नेता दिले दरीत टाकून; आरोपी मालवाहू पिकप चालकास अटक

SCROLL FOR NEXT