जाधववाडी, ता.११ ः आहेरवाडी ते वडाचा मळा परिसरातील मुख्य रस्त्यावर सध्या मोकाट गुरांची समस्या गंभीर बनली असून वाहनचालक पुरते त्रस्त झाले आहेत. तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या गायी व बैलांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहनचालक, पादचारी तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः सकाळी कार्यालयीन वेळेत आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी ही गुरे रस्त्याच्या मध्यभागी बसत असल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेकदा ही गुरे अचानक रस्त्यावर धावत येत असल्याने दुचाकीस्वारांचा तोल जाऊन किरकोळ अपघात घडत आहेत. काही दिवसांपूर्वी एका दुचाकीस्वाराला गुरे आडवी आल्याने अचानक ब्रेक मारावा लागला आणि मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिल्याची घटना घडल्याचेही नागरिकांनी सांगितले. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक रहिवाशांनी महापालिका प्रशासन आणि पशुसंवर्धन विभागाने तातडीने कारवाई करून मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.