पुणे - स्वारगेट पोलिस वसाहतींमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत पसरली आहे. त्यांच्या हल्ल्यात रविवारी लहान मुलगा जखमी झाला. कुत्र्यांच्या हल्ल्याची ही चौथी घटना असून, त्यामुळे पोलिसांची कुटुंबे भीतीच्या छायेत आहेत.
स्वारगेट वसाहतीमधील पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा लोकेश साळुंके हा रविवारी सकाळी आठ वाजता वडिलांना पाहण्यासाठी सोसायटीच्या पार्किंगमध्ये आला होता. त्या वेळी आठ ते दहा भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. नागरिकांनी धाव घेऊन लोकेशची कुत्र्यांपासून सुटका केली. कुत्र्यांनी अनेक ठिकाणी चावा घेतल्याने तो जखमी झाला आहे. कुटुंबीयांनी तत्काळ रुग्णालयात नेऊन त्याच्यावर उपचार केले.
वसाहतीमधील मुले खेळण्यासाठी घराबाहेर पडल्यावर या कुत्र्यांकडून त्यांना लक्ष्य केले जात आहे. परिणामी मुलांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिस वसाहतीच्या लाइन दफेदाराकडून या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केला जातो. मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे ‘आम्ही ड्यूटी करायची, की कुत्र्यांपासून मुलांचे संरक्षण करायचे,’ असा प्रश्न वसाहतीमधील पोलिसांनी उपस्थित केला आहे.
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात माझा मुलगा जखमी झाला आहे. वसाहतीमध्ये आतापर्यंत चार वेळा अशा घटना घडल्या आहेत. यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
- नितीन साळुंके, पोलिस कर्मचारी.
भटक्या कुत्र्यांच्या तावडीत सापडलेल्या मुलाची मी सुटका केली. भटक्या कुत्र्यांबाबत तक्रार करूनही महापालिकेकडून दखल घेतली जात नाही.
- के. जी. साकोरे, रहिवासी व प्रत्यक्षदर्शी
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.