पिंपरी - शास्तीकरासह विविध प्रश्‍नांसाठी मानवी साखळी व गाजर आंदोलन करताना सर्व विरोधी पक्षीय कार्यकर्ते.
पिंपरी - शास्तीकरासह विविध प्रश्‍नांसाठी मानवी साखळी व गाजर आंदोलन करताना सर्व विरोधी पक्षीय कार्यकर्ते. 
पुणे

सरकारविरोधी सर्वपक्षीय आंदोलनात फूट

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - शास्तीकराची संपूर्ण माफी, अनधिकृत बांधकामांचे नियमितीकरण, रेडझोन, रिंग रोड या प्रश्‍नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सर्व विरोधी पक्ष व विविध राजकीय संघटनांनी महापालिका भवनाला सोमवारी (ता. ११) मानवी साखळी करून घेराव घातला व गाजर आंदोलन केले. २१ फेब्रुवारी रोजी महापालिकेवर मोर्चा काढण्याचे ठरले. मात्र, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या निषेधार्थ सभेत एका कार्यकर्त्याने शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा निषेध केल्याने शिवसेनेने आक्षेप घेतला. त्यावरून आंदोलकांत फूट पडली. त्या कार्यकर्त्याला पोलिस बंदोबस्तात बाहेर काढल्यानंतर आंदोलन संपले.

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पक्ष, शेतकरी कामगार पक्ष यांच्यासह मराठा सेवा संघ, नागरी हक्क सुरक्षा समिती, कष्टकरी पंचायत, छावा संघटना, संभाजी ब्रिगेड, स्वराज्य इंडिया आदी संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश बाबर, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, छावा संघटनेचे धनाजी येळकर पाटील आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. 

सोमवारी दुपारी अडीच्या सुमारास गाजरांची माळ हातात घेऊन महापालिकेच्या आवारातून बाहेर पडण्याच्या फाटकापासून प्रवेशद्वारापर्यंत पुणे-मुंबई महामार्गावर मानवी साखळी केली. काहींनी गाजरे हातात घेतली होती. गाजरांच्या माळा प्रवेशद्वारावर टाकून निषेध केला.

 काहींनी आवारात प्रवेश करून घोषणाबाजी केली. त्या वेळी बाहेर पडण्याच्या फाटकालगत निषेध सभा सुरू होती. त्यानंतर काही आंदोलकांनी महापालिका भवनाच्या प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी केली. तर, शिष्टमंडळाने आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले. त्यानंतर आंदोलन संपले.

आमदार-खासदारांचा निषेध
निषेध सभेत छावा संघटनेचे धनाजी येळकर पाटील यांनी, ‘शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केवळ आश्‍वासने दिली. जनतेचे प्रश्‍न सोडविले नाहीत, अशांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही,’ असे नमूद करून भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप व शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांचा निषेध केला. त्याला शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्यासह नगरसेवकांनी आक्षेप घेतला. त्या वेळी मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्याला छावा संघटनेसह शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. ‘येळकर पाटील यांना आमचा पाठिंबा आहे. खासदारांचा निषेध व्हायला पाहिजे,’ अशी भूमिका महिलांनी घेतली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही त्यांचीच री ओढली. दरम्यान, शिवसेनेचे पदाधिकारी हे येळकर पाटील यांच्याकडे येत असल्याचे पाहून पोलिसांनी त्यांना बंदोबस्तात जमावातून बाहेर काढले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

Hadapsar : वैदुवाडी झोपडपट्टीत लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

SCROLL FOR NEXT