आंधळगाव/खुटबाव, ता. २९ : नागरगाव (ता.शिरूर) व पारगाव (ता.दौंड) दरम्यान भीमा नदीवर असलेला कोल्हापूर पद्धतीचा बंधाऱ्याचा काही भाग वाहून गेला. वेळेत ढापे न काढल्याने सोमवारी (ता.२८) सायंकाळी सातच्या दरम्यान बंधाऱ्याला भगदाड पडले. नागरगाव बाजूने पन्नास फुटांचा भराव वाहून गेला. यात नागरगाव येथील १०० हून अधिक शेतकऱ्यांच्या पाणी योजनेचे पाइप वाहून गेल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
संततधार पाऊस व भीमा नदीपात्रात वाढलेली पाणीपातळी यामुळे ग्रामस्थांनी खडकवासला पाटबंधारे खात्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे ढापे काढण्यासाठी वारंवार पाठपुरावा केलेला होता. मात्र, वेळेत कार्यवाही न झाल्याने महिन्याभरापूर्वी थोड्या प्रमाणात बंधाऱ्याच्या बाजूचा नागरगाव बाजूकडील काही भाग वाहून गेला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी कळवूनही पाहणी करण्याची पाटबंधारे खात्याने कुठलीही तसदी घेतली नाही. अखेर सोमवारी सायंकाळी सातच्या दरम्यान बंधाऱ्याचा नागरगाव बाजूकडील वनविभागाच्या हद्दीतील पन्नास फुटांहून अधिक भराव वाहून गेला. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे नागरगाव बाजूकडील नदी काठचा मातीचा भाग तसेच येथील शेतकऱ्यांच्या पाणी योजनेचे पापइही वाहून गेले.
दरम्यान, बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरगावचे माजी उपसरपंच सचिन शेलार, सोसायटीचे माजी अध्यक्ष शरद साठे तसेच शेतकरी सुहास साठे यांनी केली आहे. याबाबत खडकवासला प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन न उचलल्याने संपर्क होऊ शकला नाही.
वनविभागाच्या भूमिकेकडे लक्ष
नागरगाव येथील भराव फुटल्याने वनविभागाच्या हद्दीतील अंदाजे सात ते दहा गुंठे क्षेत्रातील मातीचा भराव वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. पाटबंधारे खात्याच्या हलगर्जीपणामुळे येथील भराव वाहून गेल्याने वनविभागाचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत वनविभाग आता काय भूमिका घेणार? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
ग्रामस्थांनी ढापे काढण्याबाबत वेळोवेळी सांगूनही काहीच कार्यवाही झाली नाही. अखेर वाढत्या पाणी पातळीमुळे बंधाऱ्याचा नागरगाव बाजूकडील काही भाग वाहून गेल्याने बंधाऱ्यासह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यापुढचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- शरद साठे, ग्रामस्थ, नागरगाव
नागरगाव येथील बंधाऱ्यालगतचा भराव फुटल्याने वनविभागाच्या हद्दीतील माती वाहून गेल्याचे स्थानिक नागरिकांकडून समजले आहे. संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली जाईल. पाटबंधारे खात्याला याबाबत त्वरित पत्रव्यवहार केला जाईल.
- नीलकंठ गव्हाणे, वनपरीक्षेत्र अधिकारी शिरूर वनविभाग
02288
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.