आळंदी, ता. ३१ : ‘‘पसायदान जगताच्या कल्याणाचा शब्दरूप आविष्कार आहे. समाजातील खलप्रवृत्ती, खलबुद्धी समाजासाठी विघातक आहे. मनुष्याची खलबुद्धी नष्ट झाली म्हणजे त्याला सज्जनत्व येते असे नाही. त्यासाठी खलबुद्धीच्या निवृत्तीनंतर मनुष्यामध्ये सत्कर्मवृत्तीची वाढ झाली पाहिजे. अंत:करणातील शुद्धतेसाठी गुणांची वाढ करावी लागते. सत्कर्माने अंत:करण शुद्धी होते. मनुष्यात सत्कर्माची आवड निर्माण झाली पाहिजे. सत्कर्मात मनुष्यदेहाचे सार्थकत्व आणि सामाजिक सुख आहे. हेच मनुष्यातील सत्कर्मरुपी सामाजिक परिवर्तन संत ज्ञानेश्वर महाराजांना पसायदानातून अभिप्रेत आहे.’’ असे प्रतिपादन चैतन्य महाराज देगलूरकर यांनी आळंदीत केले.
ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव आणि प्रमोद महाराज जगताप यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती कृतज्ञता सोहळ्यानिमित्त आयोजित पारायण सोहळ्यात पसायदानावर प्रवचन करताना देगलूरकर महाराज बोलत होते. देगलूरकर म्हणाले, ‘‘मनुष्याची खलप्रवृत्ती नष्ट झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज नकारात्मक मागणीकडून सकारात्मक मागणीकडे येतात. मानवाच्या जीवन कल्याणासाठी एकवेळ मार्ग दिसला नाही तरी मार्गदर्शन करणाऱ्यांकडे गेले पाहिजे. याने बुद्धीचा पालट होईल. एकदा का बुद्धीचा पालट झाला की, त्याच्या अंत:करणात सत्कर्माची आवड निर्माण होईल. सत्कर्माची प्रवृत्ती आली की खलत्व निवृत्त होते. खलत्वाची निवृत्ती झाली की सत्कर्मातील आवड वाढते. सत्कर्म म्हणजे पुण्यकर्म आणि चांगले कर्म. पुण्यकर्माची आवड निर्माण झाली की, आपण पापच करू नये असे वाटू लागते. सत्कर्म हे ज्ञानाचे आणि भक्तीचे मूळ आहे. सत्कर्माने अंत:करण शुद्ध होते. सत्कर्माचा परिणाम चित्त शुद्धीवर होतो. चित्तशुद्धीचा परिणाम भक्तीकर्मावर होतो. म्हणून सत्कर्माची आवड वाढावी अशी अपेक्षापूर्ण मागणी संत ज्ञानेश्वर महाराज पसायदानातून करत आहेत.’’
‘‘संतमहात्मे जगतकल्याणाची भूमिका नेहमी मांडतात. जगतातील तापदायक व्यक्तीबद्दलची भूमिका स्वतंत्र आहे. हे जगच परमात्म्याने बनविले आहे. तर इथे कोणीच निरुपयोगी नाही हे संतांना ज्ञात आहे. संत जेव्हा जगताकडे पाहतात तेव्हा प्रतिबंधक व्यक्तीची उपयुक्तता कोठे आहे हे पाहतात. विपरीत विचारांचा, अविद्येचा, अज्ञानाचा प्रतिबंध माऊलींना माहीत असल्याने माउली खलप्रवृत्तीचा नाश करा असे पसायदानात सांगतात.’’
दृष्टत्व नष्ट होण्यासाठीची मागणी
ज्यांच्यासाठी पसायदान मागायचे त्यांच्यातही खलत्व अंशतः आहे हे माउलींना माहीत आहे. सत्व, रज, तम या तीन गुणांनी आपण बनतो तेव्हा आपण सात्त्विक असतो. दुर्बल तमो गुण मनुष्यामध्ये कधी होईल सांगता येत नाही. रजोगुण वाढला की माणसातील सत्वशिलता एका क्षणात दुर्बल होते. जोपर्यंत आपला स्वार्थ जाणवत नाही तोपर्यंत माणूस सात्त्विक असतो. म्हणून प्रत्येक जीवामध्ये अंशतः खल प्रवृत्ती असतेच.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.