बारामती, ता. २९ : शहरातील खंडोबानगर चौकात वडील व दोन मुलींचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर संतप्त बारामतीकरांनी एकत्र येत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विशेष म्हणजे कोणीही नेतृत्व न करता नागरिकांनी आपणहून एकत्र येत प्रयत्नांना केलेली सुरुवात आवर्जून दखल घेण्याजोगी ठरली आहे.
खंडोबानगर परिसरातील नागरिकांनी गतिरोधक व इतर मागण्यांसाठी सोमवारी (ता. २८) रास्ता रोको केले आणि अधिकाऱ्यांना धावपळ करत एकाच दिवसात गतिरोधक करावे लागले. एक प्रकारे आंदोलनाचे हे यश होते. त्याच वेळेस काही नागरिकांनी एकत्र येत अपघातमुक्त बारामती हा व्हॉटसॲप ग्रुप तयार केला. एकाच दिवसांत एक हजार नागरिक या ग्रुपमध्ये सहभागी झाले. अनेकांनी या बाबत उपयुक्त सूचना केल्या. मंगळवारी (ता. २९) यातील सदस्यांनी एकत्र येत उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांना सविस्तर निवेदनही सादर केले. या प्रसंगी तहसीलदार गणेश शिंदे, मुख्याधिकारी पंकज भुसे, पोलिस निरिक्षक चंद्रशेखर यादव उपस्थित होते.
निवेदन देताना काही नागरिकांनी समस्या मांडल्या, काहींनी रोष व्यक्त केला, काही नागरिकांनी तातडीने उपाययोजना करण्याची गरज बोलून दाखविली. अधिकाऱ्यांनी उपस्थित सर्वांचेच म्हणणे ऐकून घेत आवश्यक ती कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.
एखाद्या प्रश्नावर एकत्र येत एक आंदोलन उभे करत प्रशासनावर दबाव वाढवून उपाययोजना करून घेण्याचा बारामतीतील हा अलीकडच्या काळातील पहिलाच प्रसंग होता. अपघाताचे प्रमाण कमालीचे वाढल्याने व वाहतूक कोंडी व वाहनतळाच्या समस्यांनी नागरिक हैराण झाले असल्याने लोकांनीच पुढाकार घेत चळवळ उभी करण्याचा हा प्रयत्न केला आहे.
लोकांचा सर्वच स्तरातून दबाव वाढत असल्याने पोलिस, महसूल, नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरटीओ या सर्वच विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही याकडे गांभीर्याने पाहिले असून, त्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काही अधिकारी फोन उचलत नाही, भेटत नाही, सूचनांची दखल घेत नाही, दुर्लक्ष करतात असा आरोप करत नागरिकांनी आपल्या तीव्र भावना उघडपणे बोलून दाखविल्या. बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.