बारामती, ता. १८ : जिल्हा परिषदेतील शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश देताना नियमांचे उल्लंघन करीत, एकाच कंत्राटदाराकडून बारामती तालुक्यातील २७७ शाळांतील गणवेश घेण्यात आले. या कामात अनेक नियमबाह्य पद्धतीने कामे करण्यात आली असून या प्रकरणी चौकशी करून सर्व संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पोपट धवडे यांनी केली आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना याबाबत तब्बल ४०० पानांचा समावेश असलेला दस्तऐवजच पोपट धवडे यांनी दिला आहे. दरम्यान शाळा व्यवस्थापन समितीकडून जे पुरवठादार प्राप्त झाले, त्यांना निधी वर्ग करण्याचे काम आमच्या स्तरावरून केल्याचा खुलासा गटशिक्षणाधिकारी नीलेश गवळी यांनी केला आहे. पोपट धवडे यांनी याबाबत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की मूळ पुरवठादार जे आहेत, त्यांच्यासह इतर दोन दरपत्रके घेतलेली आहेत, त्यापैकी एकावर मालकाचेच नावच नमूद नाही तर पत्ता व मोबाईल नंबर मूळ पुरवठादाराचेच आहेत. तिन्ही दरपत्रकांवर एकच मोबाईल नंबर असून एकानेच ती बनविल्याचे दिसत आहे.
बारामती तालुक्यातील २७७ शाळांनी एकाच व्यक्तीकडे हे काम दिल्याने यात अपहार झाला आहे. विशेष म्हणजे गटशिक्षणाधिकारी यांनीही कसलाही आक्षेप न घेता कसलीही तपासणी न करता १६ लाखांची रक्कम संबंधितांच्या खात्यावर वर्ग केली आहे. यामध्ये संबंधित व्यक्तीला या कामाचा अनुभव आहे का, त्यांच्याकडे शासनाचा जीएसटी क्रमांक आहे, त्यांच्याकडे यंत्रणा व कारागीर आहेत की नाहीत याची कसलीच शहानिशा न करता सरसकट एकाच व्यक्तीकडे हे काम सोपविण्यात आल्याने यात अपहार झाल्याचा पोपट धवडे यांचा आरोप आहे. गणवेशांची शिलाई करताना महिला बचतगटांना प्राधान्य देण्यात यावे अशा शासनाच्या सूचना असताना त्याकडे डोळेझाक करत एकाच या क्षेत्रातील कसलाच अनुभव नसलेल्या व्यक्तीला हे काम सोपविण्यात आल्याने या प्रकरणात सखोल चौकशी होऊन कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.