खोडद, ता. २४ : नगदवाडी (ता. जुन्नर) येथील ३० वर्षीय संकेत बढे यांनी तयार केलेल्या रसायनमुक्त सेंद्रिय गुळाची दुबई, स्पेनमध्ये निर्यात होत आहे. मुंबई, गुजरात, कर्नाटक, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, मालेगाव, ओडिसा, श्रीनगर आदी राज्यातूनही गुळास मोठी मागणी असते. ते दर महिन्याला ३५ ते ४३ टन गुळाची निर्मिती करतात. या व्यवसायातून त्यांना वर्षाला ५० लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.
संकेतबढे यांनी २०१७ मध्ये गुळाच्या व्यवसायात सुरुवात केली. सध्या एकूण ऊसतोड मजूर व गुळव्या आणि बाकीचे सर्व कामगार मिळून ४५ मजूर त्यांच्या कारखान्यात काम करत आहेत. प्रत्येक मजुराला कामानुसार १२ ते ३० हजार रुपये दर महिन्याला पगार दिला जातो. कच्चा माल व मजुरी यासह दर महिन्याला १९ लाख २० हजार रुपये खर्च येतो.
श्री सुधन नावाने हा गूळ त्यांनी बाजारात आणला आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पर राज्यांमध्ये देखील अनेकांना या गुळाची गोडी लागली आहे.
कोरोनाच्या काळात त्यांच्या व्यवसायाला मोठा फटका बसला. त्यांनी खचून न जाता बाजारात उच्चप्रतीचा गूळ जास्त प्रमाणात निदर्शनास न आल्यामुळे स्वतः पुढाकार घेऊन उच्च श्रेणीचा गूळ तयार केला तर नफा अधिक वाढेल हा विचार त्यांच्या मनात आला. यासाठी उत्तर प्रदेश, सातारा, सांगली, कोल्हापूर, दौंड या भागातील गूळ प्रकल्पांची सविस्तर माहिती जाणून घेतली. बढे यांच्या कुटुंबाची १२ एकर शेती आहे. त्यांनी २०२१ मध्ये गूळ प्रकल्प उभारणीला सुरुवात केली आणि २०२३ ला अवघ्या ३० गुंठे जागेत बढे यांनी हा प्रकल्प सुरू केला. त्यांनी सुरुवातीला तीन कोटी ६७ लाख रुपये भांडवलाची गुंतवणूक केली. यासाठी त्यांना राजेंद्र जगताप, जमनालाल ठक्कर यांनी आर्थिक मदत केली.
दरम्यान, पहिल्या दिवशी बढे यांनी १६०० किलो गूळ तयार केला. पहिल्याच दिवशी तयार केलेला माल ठाणे आणि नारायणगाव परिसरातील दुकानदारांना दिला. सुरुवातीला ना नफा ना तोटा अशा दरात बाजारभाव काढला. त्यांच्या कारखान्याची २४ तासात ७० टन ऊस गाळप करण्याची क्षमता आहे. २० शेतकऱ्यांकडून वार्षिक उसाचे नियोजन केले. शेतकऱ्यांना उसाच्या प्रतवारीनुसार २५०० ते ३२०० रुपये प्रतिटन बाजारभाव दिला जातो.
व्यवसायासाठी बहिण सुप्रिया, स्वाती, आई- वडील माया व संजय बढे, चुलतभाऊ संदेश बढे यांची त्यांना मदत होते.
सेंद्रिय गुळाचे विविध प्रकार
* सुंठ गूळ,
* विलायची गूळ
* बडीशेप गूळ,
* चॉकलेट गूळ,
* पीनट ड्रायफ्रुट गूळ,
* हळदी गूळ, तुळशी गूळ,
* चाय रेडीमिक्स गूळ,
* पुरणपोळी गूळ,
* गूळ बिस्कीट
01417
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.