अशोक खरात : सकाळ वृत्तसेवा
खोडद, ता.७ : मागील २५ वर्षांपासून जुन्नर तालुका बिबट्यासाठी सर्वत्र प्रसिद्ध झाला आहे, परंतु येथील लांडग्यांचे अस्तित्व संपुष्टात आल्याचे चित्र आता प्रकर्षाने दिसू लागले आहे. जुन्नर तालुक्यात लांडग्यांची संख्या घटत असल्याने वन्यजीव प्रेमींकडून चिंता व्यक्त केली जात आहे. परिसंस्थेतील जैवविविधता संतुलित राखण्यास मदत करणाऱ्या प्राण्याविषयी जनजागृती करण्याची मागणी वन्यजीव सप्ताहिकानिमित्त करण्यात येत आहे.
एकेकाळी जुन्नर तालुक्यात माळराने जशी संपुष्टात येऊ लागली तसतशी लांडग्यांची संख्या घटत गेली आणि आता लांडग्याचे दर्शनही होणे दुर्मीळ झाले आहे. माळराने राहिली नसल्याने लांडग्यांनी केलेले स्थलांतर हे मुख्य कारण आहे. हा प्राणी समूहप्रिय म्हणजेच समूहाने राहणारा, समूहाने शिकार करणारा, समूहाने पिल्ले वाढवणारा प्राणी आहे. परंतु हा प्राणी संकटग्रस्त प्रजातीमध्ये गणला जाऊ लागला आहे, याचं मूळ कारण म्हणजे नामशेष होत चाललेली माळराने होय.
भटक्या कुत्र्यांमुळे अस्तित्वात धोक्यात
माळरानांवर वाढलेले भटक्या कुत्र्यांचे प्रमाण हे एक लांडग्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करत आहे. कुत्रा आणि लांडगा हा श्वान कुळातीलच असल्याने यामध्ये प्रजनन होऊन लांडग्यांमध्ये संकर (हायब्रीडायझेशन) दिसून येत आहे. यामुळे लांडग्यांची मूळ प्रजाती धोक्यात आली आहे. या भटक्या कुत्र्यांमुळे लांडग्यांमध्ये किंवा कोल्ह्यांमध्ये रेबीज, कॅनाईन डिस्टेंपर यासारखे आजार वाढीला लागले आहेत, या आजारात लांडग्यांच्या संपूर्ण टोळ्या मृत पावत आहेत.
परिसंस्थेत लांडग्यांना महत्त्व
- तृणभक्षक प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण आणि परिसंस्थेतील जैवविविधता संतुलित राखण्यास मदत
- आजारी व अशक्त प्राण्यांची शिकारीसाठी निवड
- लांडग्यांच्या उपस्थितीमुळे वनस्पतीचे पुनरुत्थान
- लांडग्यांकडून अप्रत्यक्षपणे निसर्ग स्वच्छतेचे काम
आपल्या भागामध्ये लांडग्यांचं अस्तित्व वाढवायचे असल्यास माळरान टिकवणे गरजेचे आहे. त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये मानवी हस्तक्षेप टाळायला पाहिजे. गवताळ माळरानांवरील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करायला हवा. त्यासाठी ‘ॲनिमल बर्थ कंट्रोल’ उपाययोजना अवलंबायला हवी. लोकांमध्ये या प्राण्यांविषयी जनजागृती ही तितकीच महत्त्वाची आहे. अधिवास वाचविण्यासाठी परिपूर्ण अभ्यास आणि उपाययोजना करायला हव्यात.
- गायत्री राजगुरव अवधानी, वन्यप्राणी अभ्यासक,उपाध्यक्ष इको रेस्क्यू दौंड (एमएससी, एमफीलएन झूलॉजी)
लहानपणी सहज दिसणारे लांडगे सध्या दुर्मीळ झाले आहेत. जुन्नर आणि परिसरात मागील वीस-पंचवीस वर्षांत शेतीचा झालेला विकास, नष्ट झालेली माळराने म्हणजेच अधिवास आणि पूर्वी घरोघरी होणारे शेळीपालन आता बऱ्याच अंशी कमी होणे ही मूळ कारणे दिसतात. लांडगे पुन्हा जुन्नरमध्ये आणण्यासाठी अधिवास, लांडग्याचे वर्तनशास्र आणि इतर बाबींचा सखोल अभ्यास करून काही वर्षांचा नियोजनबद्ध कार्यक्रम आखावा लागेल.
- राजकुमार डोंगरे,निसर्ग अभ्यासक, खोडद
01658, 01657
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.