केडगाव, ता. १८ : आमच्या आयुष्यातील १९ मे १९७५ हा काळाकुट्ट दिवस. मे महिना आला की आम्ही अजूनही बेचैन होतो. काळाने झडप घालणे काय असते ते आम्ही याची देही याची डोळा पाहिले. आमच्या लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक जनता एक्सप्रेसने गार (ता.दौंड) हद्दीत उडविला अन् त्यात ६० वऱ्हाडी ठार तर १७ जण जखमी झाले होते. जिवाभावाची माणसे दगावली. हळदीचे अंग रक्ताने माखले. सनईचा सुर रूंजी घालत असतानाच क्षणात ती जागा किंकाळ्यांनी घेतली. अपघाताच्या कडू आठवणींने मन अजूनही व्याकूळ होते. अपघातातून वाचलेले बापू तावरे (नवरदेव) व हिराबाई तावरे (नवरी) डोळ्यात अश्रू आणून अपघाताचा भयानक प्रसंग सांगत होते.
बाभूळसर (ता.शिरूर) येथील एकनाथ नागवडे यांची मुलगी हिराबाई व मोरगाव (ता.बारामती) येथील पर्वती तावरे यांचा मुलगा बापू यांचा विवाह १८ मे १९७५ रोजी बाभूळसर येथे झाला. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी बबन टेकवडे (रा. बाभूळसर) यांनी पंरपरेनुसार वऱ्हाड ‘अडवून’ मांसाहारी स्नेहभोजन दिले. वऱ्हाड मोरगावच्या दिशेने १९ मे रोजी निघाले. गार हद्दीत येडेवस्ती येथे फाटक व पहारेकरी नसलेल्या रेल्वे क्रॅासिंगवर दुपारी दीड वाजता वऱ्हाडाचा ट्रक व जनता एक्स्प्रेसची जोरदार धडक झाली. या गेटला जळके गेट म्हणून सुद्धा ओळखले जाते.
धडक होताच प्रचंड आवाज होऊन ट्रक हवेत उडाला. धडक ट्रक केबिनच्या मागे बसली. त्यामुळे केबिनमधील नवरा नवरी जखमी झाले पण सुदैवाने बचावले. अपघाताची खबर बाभूळसरला एकाने सायकलवरून येऊन दिली. खबर गावात वाऱ्यासारखी पसरली. सारा गाव रेल्वेगेटच्या दिशने पळत सुटला. अपघातानंतर बघ्यांची खूप मोठी गर्दी झाली. यवतचे तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य भोगीलाल शहा अपघात पाहून आल्यानंतर त्याच दिवशी त्यांचे ह्रदय विकाराने निधन झाले.
अपघातात अर्भकापासून ६० वर्षांचे वृद्ध
अपघातात नवरीबरोबर निघालेल्या तिच्या दोन बहिणी, एक चुलते व आजी ठार झाल्या. नवरदेवाचे वडील, दोन भाऊ, तीन आत्या, दोन बहिणी ठार झाल्या. मृतांमध्ये दोन महिन्याच्या अर्भकापासून ते ६० वर्षांपर्यंतचे वृद्ध होते. अपघातग्रस्तांना मदत खूप उशिरा मिळाली. दौंडमधील डॅाक्टर के.टी.शहा, के.एस.चांदेकर, सतीशकुमार रेड्डी व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी येऊन जखमींवर प्राथमिक उपचार केले. सायंकाळी सात वाजता दौंड येथून विशेष रेल्वेने गंभीर जखमींना पुण्यात आणण्यात आले. जखमींना तातडीने मदत मिळावी म्हणून ससून रुग्णालयाने स्टेशनवर विशेष व्यवस्था केली होती.
देव तारी त्याला कोण मारी...
अपघातात २२ महिन्यांचे कुमार श्यामराव जगताप (रा. आंबळे ता. पुरंदर) हे बालक आश्चर्यकारकरीत्या बचावले. ‘आमचे नशीब बलवत्तर म्हणून मी व माझी आई या अपघातातून बचावलो.’ असे कुमार जगताप यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. नवरदेवाची आई द्वारकाबाई तावरे यांना ‘गाडी लागते’ म्हणून त्या बैलगाडीने मोरगावकडे जात होत्या. त्यामुळे त्या बचावल्या.
लग्नाशी संबंध नसतानाही रणनवरे कुटुंबाचा अंत
राख (ता. पुरंदर) येथील सीताराम रणनवरे हे पत्नी व तीन मुलांसाह सासरवाडी गार येथे यात्रेसाठी आले होते. यात्रा पार पडल्यानंतर रणनवरे यांचे मेहुणे सुभाष नांदखिले हे पाटस येथे बैलगाडीने सोडण्यासाठी निघाले होते. याचवेळी ट्रक गारमध्ये थांबला होता. एका नातेवाइकाच्या आग्रहाखातर रणनवरे कुटुंबीय ट्रकमध्ये बसले. या अपघातात रणनवरे, त्यांची पत्नी, तीन, पाच, सात या वयाचे तीन मुलगे ठार झाले. त्यांच्या घराला कायमचे कुलूप लागले. रणनवरे कुटुंबाचा आणि लग्नाचा काहीही संबंध नव्हता. रणनवरे कुटुंबीयांचा अंत्यविधी गार येथे करण्यात आला.
अपघाताचा आघात मनावर खोलवर रुजला आहे. मे महिना आला की आठवणी तीव्रतेने येतात. दुःख गिळावे लागते. माझ्या वडिलांनी अपघाताचा खूप वर्षे धसका घेतला होता. आज सर्व काही आहे पण जिवाभावाची माणसे आम्हाला सोडून गेली.
- हिराबाई तावरे
अपघाताचे दृष्य हृदय पिळवटून टाकणारे होते. अनेक जखमींना आम्ही पाणी पाजून सावलीत बसवले. चालकाने अपघात मुद्दाम केल्याची अफवा बिनबुडाची व खोटी आहे.
- हरिभाऊ येडे, प्रत्यक्षदर्शी
अपघातानंतर सकाळमध्ये अग्रलेख
अपघातावर ‘सकाळ’ने २१ मे १९७५ ला अग्रलेख लिहिला होता. त्यात पहारेकरी ठेवायचे नसतील तर भुयारी मार्ग करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली गेली होती. ‘सकाळ’ने दूरदृष्टीने केलेली सूचना ५० वर्षानंतर विलंबाने अमलात येत आहे. अपघाताच्या ठिकाणी २०२३ मध्ये भुयारी मार्ग झाला आहे. देशभरात रेल्वेने आता बहुतांश गेट बंद करून भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल केलेत.
03727, 03728, 03726
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.