शिक्रापूर, ता. १ ः येथील चाकण चौकातून प्रवासी बसमधून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला खाली उतरवून त्याचे अपहरण करीत सणसवाडी, आळंदी (ता. खेड) या भागात नेत पैशाची मागणी करून हातपाय बांधून डांबल्याचा प्रकार मंगळवारी (ता. २९) घडला.
या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी अमोल कुंडलिक हरगुडे (रा. सणसवाडी, ता. शिरूर), रोहन मदन मारडीकर (रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर), संजय बबन वीरकर (रा. केळगाव, ता. खेड) यांसह दोन अनोळखी व्यक्तींवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शिक्रापूर व आळंदी पोलिसांनी एकत्रित केली.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, सणसवाडी (ता. शिरूर) येथील अमोल हरगुडे याच्या खोलीत भाड्याने राहणारा गोकूळ खांडरे याने काही दिवसांपूर्वी त्याच्या ओळखीच्या यादव नावाच्या व्यक्तीला हरगुडे व मारडीकर यांच्याकडून १५ लाख रुपये उसने घेऊन दिले होते. यातील आठ लाख रुपये अमोल व रोहन यांना यादवने परतही दिले होते. मात्र, याच काळात यादव याला एका दुसऱ्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत जावे लागल्याने उर्वरित पैसे खांडरे याला परत देता आले नाहीत. यादव जेलमधून आल्यानंतर मी त्याच्याकडून घेऊन आपले सर्व पैसे परत देतो असे गोकूळ याने अमोल व रोहन यांना वारंवार सांगितले. मात्र, या दोघांनी उर्वरित पैशांचा रोहनच्या मागे तगादा लावला. अशातच मंगळवारी गोकूळ हा खासगी बसमधून शिक्रापुरातून पुढे जात असताना, अमोल व रोहन यांनी त्याला बसमधून उतरवून मारहाण करत उर्वरित पैशांची मागणी केली. शिवाय एका मोटारीमधून त्याचे अपहरण करीत त्याला सणसवाडी येथे नेऊन जबर मारहाणही केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी गोकूळ याला आळंदी येथे नेले व तेथे एका खोलीमध्ये त्याचे हातपाय बांधून ठेवत त्याला पुन्हा बेदम मारहाण केली. याच काळात गोकूळ याने त्याच्या काही मित्रांना घडलेला प्रकार मोबाईलवरून कळविला व आपले लोकेशनही त्याने शेअर केले. यावरून गोकूळच्या मित्रांनी आळंदी पोलिसांना प्रकरणाची माहिती व गोकुळचे लोकेशन दिले. यावरून आळंदी पोलिसांनी गोकूळ व त्याला मारहाण करणारे आरोपी या सर्वांनाच ताब्यात घेतले. गोकूळ पंडितराव खांडरे (वय ३५, रा. कसबा बावडा, राजाराम कॉलनी, जि. कोल्हापूर) याची सुटका आळंदी पोलिसांनी केली. या सर्वांना शिक्रापूर पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर गोकूळ याच्या फिर्यादीनुसार अपहरण व मारहाणीचे गुन्हे दाखल करत तिघांना अटक केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे व प्रतीक जगताप करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.