काटेवाडी, ता. ४ : अपुऱ्या पर्जन्यमानामुळे अंजीर बागांवर प्रथमच स्केल इंसेक्ट या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. कोणत्याही फवारण्यांना ही कीड दाद देत नसल्याने अंजीर उत्पादक हतबल झाले आहेत. तर कृषी संशोधक देखील या किडीवर प्रभावी उपाय योजना करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत आहेत.
स्केल इंसेक्ट या किडीचा प्रादुर्भाव मागील काही काळापासून दिसून आला होता. जाड व मेणचट कवचामुळे हे कीटक सहसा फवारण्यांना प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे. सर्वप्रथम या रोगाचे कीटक झाडाच्या खोडावर आढळून येतात. कीड लक्षात आली तरी फवारण्यांचा फारसा परिणाम या किटकावर होत नसल्याने काही कालावधीतच प्रजनन वाढून या कीटकांची संख्या फोफावते. खोड, फांद्या, पाने, फुले व फळांवर परिणाम करतात. ही रस शोषक कीड असल्याने फळधारणे काळात या किडीचा प्रादुर्भाव बागांमध्ये झाल्यास मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फटका बसत आहे. ज्या बागेमध्ये फळधारणा झाली आहे, अशा बागांवर देखील या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. परिणामी झाडांची प्रतिकार क्षमता कमी होते. तसेच फळांवर या किडीमुळे डाग तयार होतात. सहाजिकच अशी फळे बाजारामध्ये विक्री करताना मोठी अडचण येते. किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असेल तर फळे काळी देखील पडतात व जागेवर गळून जातात.
स्केल इंसेक्ट या किडीवर अनेक फवारण्या केल्या. मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नाही. जाधववाडी (पुरंदर) येथील सीताफळ व अंजीर संशोधन केंद्राकडे देखील या किडीबाबत आम्ही कळवले. मात्र, येथील संशोधकांनी सुचवलेले सर्व उपाय या किडीवर निष्प्रभ ठरले आहेत. आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी इमिडाक्लोप्रिड, फिप्रोनील, क्लोरोपायरीफॉस, सायपरमेथिन, बोप्रोफेझीन, एसीफेट, कायमिथॉलर, स्पायरोटेट्रामॅट, थायमेथॉक्सझम आदी औषधांच्या फवारण्या केल्या. मात्र याचा कोणताही परिणाम किडीवर दिसला नाही.
- दीपक जगताप, संचालक, अखिल महाराष्ट्र अंजीर उत्पादक संशोधक संघ
किडीवरील फवारण्याबाबत संशोधन सुरू आहे. काही कीटकनाशकांच्या तपासण्या देखील करण्यात आल्या. अद्याप कोणत्याही कीटकनाशकाची शिफारस केली गेली नाही. याबाबत एके ठिकाणी ॲपलॉड व बोप्रोफेझीन आदींची फवारणी ही कीड प्राथमिक अवस्थेमध्ये केल्यास नियंत्रणात येते. मात्र, या किडीवरील मेणचट आवरण वाढल्यास ही कीड नियंत्रणात येण्यास उशीर लागतो. मिलीबगप्रमाणे या किडीवरील वरचे आवरण कमी करून बुरशीयुक्त कीटकनाशक फवारल्यास ही कीड नियंत्रणात येते.
- युवराज बालगुडे, वनस्पती रोग शास्त्रज्ञ, सीताफळ व अंजीर संशोधन केंद्र जाधववाडी
00042, 00044
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.