माले, ता. १३ : मुळशी धरण परिसरातील चांदीवली (ता. मुळशी) येथील श्री भैरवनाथ देवस्थान ऊर्फ बहिरदेव मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी देवस्थानची साडेसात एकर जमीन विक्री करण्याची प्रक्रिया ट्रस्टतर्फे सुरू करण्यात आली आहे. मात्र, या विक्रीला देवस्थानचे खजिनदार आणि ग्रामस्थांनी धर्मादाय आयुक्तांकडे हरकत नोंदवून विरोध दर्शविला आहे.
तसेच महसूल मंत्री, धर्मादाय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे लिलावास स्थगिती देण्याची मागणी केली आहे. ट्रस्टच्या अध्यक्षांनी मात्र जमीन विक्री प्रक्रीया ग्रामस्थांच्या संमतीनुसारच असल्याचा दावा केला आहे. देवस्थानचे अध्यक्ष विठ्ठल कृष्णा पडवळ यांनी चांदीवली गावातील सर्व्हे नं. ३३, ३४, ५७/१ आणि ८९/१ मधील एकूण साडेसात एकर देवस्थान मालकीची जमीन ‘जशी आहे तशी’ स्थितीत विक्रीस काढण्याची मागणी धर्मादाय आयुक्तालयाकडे केली आहे. त्यानुसार धर्मादाय आयुक्तालयाने वर्तमानपत्रात नोटीस प्रसिद्ध करून इच्छुकांकडून ३० दिवसांच्या आत निविदा मागविल्या आहेत. योग्य निविदाधारकांची निवड धर्मादाय सहआयुक्तांच्या परवानगीनंतर केली जाणार असून, त्यानंतर विक्रीची अंतिम कार्यवाही होणार आहे.
मात्र, या प्रक्रियेविरोधात ट्रस्टचे खजिनदार रामचंद्र पडवळ आणि ५६ ग्रामस्थांनी धर्मादाय आयुक्तांकडे लेखी हरकत नोंदवली आहे. त्यात म्हटले आहे की, ‘‘देवस्थानाची जमीन ही गावकऱ्यांच्या धार्मिक आणि सार्वजनिक कार्यासाठी आहे. ती परस्पर व बेकायदा विकण्याचा प्रयत्न सुरू असल्यामुळे ग्रामस्थांचे नुकसान होणार आहे.’’
ग्रामस्थांनी विरोध दर्शवीत सांगितले, ‘‘दानशूर व्यक्ती, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ वर्गणीच्या मदतीने मंदिराचा जीर्णोद्धार करता येऊ शकतो. देवस्थानची जमीन विकण्याचा निर्णय चुकीचा आहे.
ग्रामस्थांची दिशाभूल करुन त्यांच्या सह्या घेण्यात आल्या. काही जमिनी अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असून, त्या काही निवडक लोकांच्या फायद्यासाठी कवडीमोल दरात विकल्या जाणार आहेत. विक्री स्थगित करावी त्याऐवजी जमीन भाडे पट्ट्याने द्यावी.’’
ट्रस्टच्या अध्यक्षांनी फेटाळले आरोप
देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल कृष्णा पडवळ यांनी आरोप फेटाळत सांगितले की,‘‘मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ट्रस्ट स्थापन करून ही प्रक्रिया पाच वर्षांपासून सर्वांच्या संमतीने सुरू आहे. विरोध करणाऱ्यांनीच पूर्वी जमीन विक्रीसाठी ठराव आणि सह्या केल्या होत्या. सर्वांत जास्त रक्कम देणाऱ्यालाच शासकीय नियमानुसार लिलाव पद्धतीने ही जमीन दिली जाईल. ग्रामस्थांची इच्छा असल्यास या पैशातून ट्रस्टच्या नावे नवी जमीन घेऊ. धर्मादाय आयुक्तांचा जो निर्णय येईल, तो आम्हाला मान्य राहील. मंदिर बांधून पूर्ण कधी करणार हे जाहीर करावे, विरोधाचा हेतू मंदिर नव्हे, तर येऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माझी बदनामी करणे आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.