महुडे, ता. २८ : भोर शहराकडे येण्यासाठी चार बाजूने मुख्य रस्ते आहेत. या कोणत्याही रस्त्यावरून भोरला यायचे झाले तर येणाऱ्या प्रवाशांचे स्वागत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांनी होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून चारही बाजूच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून प्रवासी, नागरिक यातूनच प्रवास करत आहेत.
वारंवार मागणी होत असतानाही प्रशासन, ठेकेदार मात्र दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आता आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.
भोर- कापूरव्होळ- पुणे मार्गावर भोर प्रवेशद्वार ते भोलावडे हद्दीतील बुवासाहेबवाडीच्या मोरीपर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. अक्षरशः रस्त्याची चाळण झाली असून, यातून वाहने चालवताना चालकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरून पायी जाणाऱ्या लोकांच्या, तसेच शाळकरी मुलांच्या अंगावर खड्ड्यातील पाणी उडण्याचे प्रकार घडत आहेत. भोर- शिरवळ मार्गावर रस्ता रुंदीकरणासाठी रामबाग ते उत्रौली, वडगावपासून शिंदेवाडीपर्यंत जागोजागी खोदकाम केलेले आहे. रामबाग येथे एसटी स्थानकाकडे जाताना मोठे खड्डे पडले आहेत. भोर- मांढरदेवी मार्गावर भोर चौपाटी ते भोर शहरातील विद्यानगर, वाघजाईनगर परिसरात खोदकाम केले आहे. तसेच, भोर महाड मार्गावर भोर पिराचा मळा फाटा ते वेनवडीच्या ओढ्यापर्यंत जानेवारीमध्ये खोदकाम करूनही काम अपूर्णच आहे. ओढ्यावरील पुलाचे काम सुरू असल्याने बनवलेला पर्यायी रस्ता चिखलाचा आहे. भोरकडे येणारे चारही रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे भोरकर, तसेच भोरमधील पर्यटनस्थळांवर येणाऱ्या पर्यटकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
संबंधित ठेकेदाराला खड्डे बुजवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर उर्वरित अपूर्ण असलेल्या रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.
- राजेसाहेब आगळे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, भोर
भोर ते बुवासाहेबवाडी दरम्यानचा रस्ता अत्यंत खराब झाला असून, येथून दुचाकीस्वार जीव मुठीत धरून प्रवास करीत आहेत. यासाठी अनेक वेळा निवेदन देऊन आणि वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांनी तक्रार करूनही संबंधित प्रशासन आणि ठेकेदार कोणतीही दखल घेत नाहीत. याच रस्त्यावरून सर्व लोकप्रतिनिधी ये- जा करताना ही दुरवस्था पाहत आहेत पण दुर्लक्ष करीत आहेत.
- प्रमोद कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते, भोर
भोलावडे हद्दीतील रस्त्यावरील खड्डे धोकादायक झाले आहेत. राजा रघुनाथराव आणि विद्या प्रतिष्ठानची शाळा याच मार्गावर असल्याने विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरत आहे. वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष होत आहे. तातडीने खड्डे बुजवावेत, अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
- प्रवीण जगदाळे, सरपंच, भोलावडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.