नारायणगाव, ता. ४ : येथे पुणे-नाशिक महामार्गावर एक नर जातीचा पाच ते सहा वर्षे वयाचा बिबट्या गुरुवारी (ता. ४) मृतावस्थेत आढळला. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाची धडक बसल्याने त्याचा मृत्यू झाला. डोक्याला गंभीर इजा होऊन त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तवला आहे.
नारायणगाव येथे मीना शाखा कालव्यालगत मुक्ताई ढाब्याजवळ महामार्गालगत दिलीप पाटे यांची शेती व घर आहे. गुरुवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पाळीव कुत्र्याचा भूंकण्याचा आवाज ऐकून ते बाहेर आले. त्यावेळी त्यांना महामार्गावर बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती त्यांनी पोलिस ठाणे व वनविभागाला दिली.
दरम्यान, पोलिस पाटील सुशांत भुजबळ, रेस्क्यू टीम सदस्य किरण वाजगे, नंदू अडसरे, अंबादास वाजगे, चिराग कोऱ्हाळे हे घटनास्थळी आले. त्यांनी महामार्गावर मध्यभागी मृतावस्थेत पडलेल्या बिबट्याला उचलून रस्त्याच्या कडेला ठेवले. त्यानंतर पोलिस नाईक आदिनाथ लोखंडे, वनरक्षक रामेश्वर फुलवाड यांनी मृत बिबट्याला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात नेले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.